शिवसेना (उबाठा) गटाला खिंडार
नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेना (उबाठा) गटाला खिंडार पडले आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या कार्य प्रणालीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना (उबाठा) विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि महिला पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना (उबाठा) नेरुळ विभाग प्रमुख तेजस म्हात्रे, महिला उप विभाग संघटक पल्लवी काटकर, नेरुळ गांव मधील शाखा क्रमांक-९५ आणि ९३ शाखा प्रमुख गणेश राऊत, उपशाखा प्रमुख सुरज कोसले, उप शाखा प्रमुख संदीप सुर्वे, उप शाखाप्रमुख प्रविणकुमार यादव, युवा शाखा अधिकारी कुणाल रोटकर, युवा उप शाखा अधिकारी दर्शन म्हात्रे, युवा उप शाखा अधिकारी यश मोरे, गट प्रमुख वैभव म्हात्रे यांच्यासह सदर दोन्ही शाखेतील शेकडो शिवसैनिक, युवा आणि महिला शिवसैनिक यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच भाजपा नेरुळ प्रभाग क्रमांक-८७ मधील युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत पोमण यांनीही समर्थक कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केला.
नेरुळ येथील देवाडिगा भवन मध्ये झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य जनतेसाठी विविध योजना राबवित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने एक कुशल नेतृत्व राज्याला लाभले आहे. राज्याचा सर्वांगिण विकास महायुती करत असल्याने नवी मुंबईतील शिवसेना (उबाठा) मधील असंख्य कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने शिवसेना मध्ये प्रवेश करत आहेत. इथे मनामध्ये कोणीही भीती बाळगू नये, शिवसेना प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देईल, असा विश्वास यावेळी बोलताना उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेते विजय नाहटा, महिला नवी मुंबई जिल्हा संघटक सरोजताई पाटील, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील, संजय भोसले, रामाशेठ वाघमारे, नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने, उप शहर प्रमुख संतोष थोरात, विभाग प्रमुख बाळू घनवट, विभाग प्रमुख अरुण गुरव, बेलापूर विधानसभा वैद्यकीय कक्ष अधिकारी कल्पेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिवसेना (उबाठा) आणि भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशासाठी उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.