निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खाजगी यंत्रणा -राजन विचारे

ठाणे : ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. त्यानुसार जनमत आपल्या बाजुने असताना कटकारस्थाने करुन पैसा आणि सत्तेचा गैरवापर झाला आहे. निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतील अधिकारांच्या नेमणुका करुन सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे.

याप्रसंगी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहरप्रमुख उपशहर प्रमुख, सचिव तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोग वारंवार असे सांगते की, निवडणूक प्रक्रिया सपूर्ण पारदर्शकता आहे. परंतु, ती पारदर्शकता ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये दिसून न आल्याने ‘शिवसेना-ठाकरे गट'चे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त-दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र राज्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी-ठाणे तथा जिल्हाधिकारी यांना  १८ आणि १९ जुलै २०२४ पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुराव्यांसह पत्र दिले आहे. परंतु, अद्यापही याचे लेखी उत्तर प्राप्त न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रामध्ये नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा, अशी मागणी विचारे यांनी पुन्हा केली होती.

माजी खासदार राजन विचारे यांनी १८ जुलै रोजी दिलेल्या पत्रामध्ये २ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून १७ सी अर्जावर नमूद केलेले मतदारांची संख्या आणि ४ जून २०२४ रोजी निकालानंतर फॉर्म नंबर २० वर केलेल्या मतदारांची संख्या यामध्ये तफावत असल्याचे भासून आल्याने याचे स्पष्टीकरण द्यावे. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनच्या POLL. END. TIME. मध्ये दाखवण्यात आलेला टाईम हा ECI च्या निदर्शनाप्रमाणे संध्याकाळी ६ पर्यंत असणे आवश्यक असताना मशीन्स वेळेच्या आधी बंद झालेल्या आढळून आले आहेत, याचे स्पष्टीकरण द्यावे. ईव्हीएम मशीन १२ तास वापरुन सुध्दा मतदान ९९ % दाखवत होत्या, याचे स्पष्टीकरण द्यावे. मिरा-भाईंदर मधील ईव्हीएम द्वारे मतमोजणी झालेली आकडेवारी व्हीव्हीपॅट स्लीप यात तफावत आढळल्याचे निदर्शनास आले असून त्याचेही स्पष्टीकरण द्यावे, अशा मुद्द्यांचा समावेश आहे.

तर १९ जुलै रोजी निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी ठाणे यांना दिलेल्या पत्रामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत १४५, १४६, १४७, १४८, १५० आणि १५१ विधानसभा मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी आणि या दुबार मतदारांनी २ ते ३ वेळा केलेल्या मतदाराची पुरावे सहीत दिलेली आहेत. सदरची दुबार नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरणासाठी अधिकृत पुरावे ‘निवडणूक आयोग'कडे असल्याने याची पडताळणी करुन त्यांनीच याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भारत निवडणूक आयोग आणि ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. परंतु, याची दखल घेतली जात नसल्याने माजी खासदार राजन विचारे यांनी सरकारी यंत्रणेवर संशय व्यवत केला आहे.  ओढले आहेत.

सरकार बदलत असतात, कोणी कायमस्वरुपी नसतात. अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी काम करुन घेतली जात आहेत. लोकसभेला आम्ही सहन केले, विधानसभेला सहन केले जाणार नाही. तसेच कोणी कामे केलेली आहेत, या सर्व लोकांची नावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास नक्की जाहीर करु. प्रसंगी रस्त्यावर उतरुन काम करावे लागेल, असा इशाराही शिवसेना नेते राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिला आहे.

बोगस मतदानाला प्रोत्साहन देऊ नका, दोषींवर कारवाई करा...
दुबार नावे वगळण्यासाठी वारंवार पत्र देवून सुध्दा ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या मतदार यादीमध्ये दुबार मतदारांचा आकडा पुन्हा वाढल्याने राजन विचारे यांनी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा दुबार नावांच्या मतदार याद्या जिल्हाधिकारी आणि सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन दुबार नावे वगळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच एखाद्या यादीमधील अपरिचित व्यक्ती जे कोणी तेथे राहत नसतील, तर त्यांना नोटीसा पाठवून त्यांचे नाव कोणत्या यादीमध्ये ठेवावे, यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही विचारे यांनी केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 शिवसेना (उबाठा) गटाला खिंडार