नवी मुंबईकरांच्या हक्काच्या रोजगारासाठी...मनसेचा रोजगार हक्क सप्ताह सुरू
८० टक्के स्थानिकांना नोकरी नाही दिली तर उद्योगमंत्री उदय सामंत व मंगलप्रभात लोढा यांचे पुतळे जाळू... गजानन काळे यांचा इशारा
नवी मुंबई : महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये ८०% नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या यासाठी नवी मुंबई मनसेने ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह सुरू' केला आहे. या संदर्भात मनसेने नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत माहिती देताना मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की, या सप्ताहात नवी मुंबईतील विविध चौकात, विविध रेल्वे स्थानकाच्या बाहेर सही मोहीम राबवून मनसेच्या या चळवळीस पाठिंबा देण्याची विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नवी मुंबईकरांना पत्रके वाटून या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करणार आहेत. अशी माहिती काळे यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये ८०% नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, असा शासन निर्णय असताना सुद्धा सरकारी यंत्रणा याची अंमलबजावणी करत नाही. सरकारी यंत्रणांच्या अशा कामचुकार वागणुकीमुळे करोडो स्थानिक मराठी तरुणांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात नवी मुंबई मनसेने गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाला पत्र देण्यात आले. अधिकाऱ्यांची उदासीनता पाहून मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. त्याचप्रमाणे मनसे येत्या काही दिवसात या विषयाशी संबंधित सर्व सरकारी आस्थपणांना निवेदन देणार आहे. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक थोड्याच दिवसात विविध कंपन्यांना पत्र देऊन ८० टक्के स्थानिक मराठी मुलांना नोकर्या द्या अशी मागणी करणार आहेत. या सोबत बेरोजगार युवकांची नोंदणी करून, त्यांचे बायोडाटा गोळा करून कंपन्यांना जाऊन हे बायोडाटा देण्यात येतील. नवी मुंबईतील ज्या युवकांना बायोडाटा देऊन अशी नोंदणी करायची असेल त्यांनी ९८१९११३३३६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा [email protected] या ई मेल वर संपर्क करू शकता.
नवी मुंबईतील बेरोजगारी संपुष्टात यावी व इथे निर्माण होणारे रोजगार स्थानिक तरुणांना मिळावे, यासाठी मनसे आग्रही आहे. यासाठी सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाने तात्काळ सर्व कंपन्यांशी संलग्न नोंदणी करून या कंपन्यांना ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यास भाग पाडावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व मंगलप्रभात लोढा यांचे पुतळे जाळू असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत गजानन काळे यांच्या सह सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम, अभिजित देसाई, डॉ. आरती धुमाळ, संदेश डोंगरे हे उपस्थित होते.