साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हडप करण्याचा प्रयत्न ; खोटया सह्या केल्याचे उघडकीस

बनावट कागदपत्रांच्या आधारे  साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हडप करण्याचा प्रयत्न 

नवी मुंबई : सिडकोकडून साडेबारा टक्के योजने अंतर्गत उरण मधील जसखार गावातील मृत धनंजय आत्माराम ठाकूर यांना मिळणारा भूखंड परस्पर हडप करण्यासाठी मृत धनंजय ठाकूर यांचे छोटे भाऊ विजय आत्माराम ठाकूर याने व इतरांनी सिडकोमध्ये सहा जणांचे खोटे व बनावट रहिवाशी दाखले सादर केल्याचे तसेच धनंजय ठाकूर यांच्या खोटया सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन मृत व्यक्तींना जिवंत असल्याचे दाखवून त्यांनीच जे एन पी टी मध्ये कागदपत्रे सादर केल्याचे भासविण्यात आले आहे. 

या प्रकरणात न्हावाशेवा पोलिसांनी एकुण 10 जणांविरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

जसखार येथील धनंजय आत्माराम ठाकूर यांची जमीन जेएनपीटी प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आली होती. त्यापोटी धनंजय ठाकूर यांना साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंडाचे वितरण होणार होते. हाच कोटयवधी रुपये किंमतीचा भुखंड परस्पर हडप करण्यासाठी धनंजय ठाकूर यांचे छोटे भाऊ विजय आत्माराम ठाकूर याने व लीना लक्ष्मीकांत पाटील यांनी जसखार गावचे रहिवाशी नसताना जसखार गावचे ग्रामसेवक राजेंद्र सातंगे याला हाताशी धरुन एकूण सहा जणांचे एकत्रित खोटे व बनावट रहिवाशी दाखले बनवुन घेतले. त्यानंतर वकील विजय ठाकूर व इतरांनी मृत धनंजय ठाकूर यांच्या खोटया सह्या मारुन न्यायालयातील कागदपत्रांचा खोट्या अर्थाने वापर करून जेएनपीटी मार्फत सिडको मध्ये साडेबारा टक्के योजनेचा भूखंड मिळण्यासाठी फाईल सादर केली होती.  

हा प्रकार धनंजय आत्माराम ठाकूर यांचे मुळ वारसदार शिरीष धनंजय ठाकुर  यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती काढली असता, त्यांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. सदर फाईल जमा करताना मृत कृष्णराम आत्माराम ठाकूर व धनंजय आत्माराम ठाकूर या दोन व्यक्तींना जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या जागी दोन बनावट व्यक्तींना जेएनपीटी अधिकाऱयांसमोर उभे करण्यात आल्याचे आढळुन आले. विजय आत्माराम ठाकूर याने मृत झालेल्या चुलत भावाच्या तीन मुलींना स्वतच्या सख्ख्या मृत भावाच्या मुली दाखविले आहे. तसेच विजय ठाकूर यांचे सख्खे भाऊ व लीना पाटील यांचे वडील व मृत कृष्णराम आत्माराम ठाकूर हे सुशिक्षित व निवृत्त मुख्याध्यापक असतानाही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वाक्षरी ऐवजी हाताचा अंगठा घेतलेल्याचे कागदपत्रावरुन निदर्शनास आले.  

त्यानंतर धनंजय ठाकूर यांचा मुलगा शिरीष ठाकूर याने न्हावा शेवा पोलिसांकडे याबाबत दोन महिन्यापुर्वी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने शिरीष ठाकुर याने पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्हावा शेवा पोलिसांनी कळंबोली येथे राहणारा व पेशाने वकील असलेला विजय आत्माराम ठाकूर, उरण मधील नागाव येथे राहणारी लीना लक्ष्मीकांत पाटील, पनवेल येथील मधुकर ठाकूर, सुमती म्हात्रे, कुसुमावती पाटील व जसखार ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र सातंगे, उरण पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी निलम गाडे, जसखार ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व उपसरपंच दामोदर घरत व शैलेश ठाकूर, व साडेबरा टक्के योजना हाताळणारे जेएनपीटीचे अधिकारी या दहा जणांविरोधात फसवणुकीसह बनवटगिरी आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.   

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्रियंका पॅलेस (जागर रेस्टारँट आणि बार) लेडीज बारवर सोमवारी रात्री कळंबोली पाेलिसांचा छापा