1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे ई-सिगारेट जप्त   

नेरुळमध्ये ई-सिगारेटची विक्री करण्यासाठी आलेला तरुण अटकेत  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी सायंकाळी नेरुळ सेक्टर-6 मध्ये ई-सिगारेटची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सापाळा लावुन अटक केली आहे. श्रुतीक विजय जाधव (24) असे या तरुणाचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडुन 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे ई सिगारेट जप्त केले आहेत. सदरचे ई-सिगारेट तो कुणाला विक्री करणार होता, याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.    

नेरुळ सेक्टर-6 मधील पामबीच मार्गालगत द वुड झोनच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती ई-सिगारेटची डिलीव्हरी देण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे व त्यांच्या पथकाने गुरुवारी दि.18 मे रोजी सायंकाळी नेरुळ सेक्टर-6 मध्ये सापळा लावला होता. सायंकाळी 6.30 च्या सुमारास श्रृतीक जाधव हा तरुण पामबीच मार्गालगत द वुड झोनच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर ई-सिगारेटचा साठा असलेला बॉक्स घेऊन आल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड केली.  

त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने श्रृतीक जाधव याच्या जवळ असलेल्या बॉक्सची तपासणी केली असता, सदर बॉक्समध्ये 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 130 ई-सिगारेट आढळुन आले. सदरचे ई सिगारेट तो विक्री करण्यासाठी घेऊन आल्याचे चौकशीत आढळुन आल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ई सिगारेटचा साठा जप्त केला. त्यानंतर ई सिगारेटाचा साठा घेऊन आलेल्या श्रृतीक जाधव याच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात द प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट 2019 चे कलम 4 (1) 7 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.    

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याने पनवेल पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एकाला केली अटक