70 लाखांच्या 13 मोटार कार हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश  

मोटारकार चोरी करणारी सराईत चौकडी अटकेत

 नवी मुंबई : चोरीच्या वाहनांवर इन्शुरन्स कंपनीकडुन विकत घेतलेल्या अपघातग्रस्त वाहनांचे चेसिस, इंजिन नंबर छापुन त्यांची विक्री करणाऱया टोळीतील चौकडीला गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने अटक केली आहे. या चौकडीने नवी मुंबई व मुंबई परिसरातून चोरलेल्या तब्बल 70 लाख रुपये किंमतीची 13 वाहने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीने केलेले 15 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या टोळीकडुन आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी दिली.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटारकार चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस आयुक्त मिलिंद भांरखे व सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा, कक्ष-1 च्या अधिकारी व अंमलदारांनी या वाहन चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास सुरू केला होता. त्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, 24 ऑगस्ट 2022 रोजी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींनी चोरलेली इर्टिंगा कार महापे गावातून मिलिनियम बिझनेस पार्ककडे जाणाऱया रस्त्यावर पार्क केल्याचे आढळून आले. त्याच दिवशी खारघर मधून चोरलेली स्कॉर्पिओ कार देखील चोरटÎांनी इरटिगा कार पार्क केलेल्या ठिकाणी आणल्याचे निदर्शनास आले.  

 सदरच्या कार हया मुंबई व ठाण्यात गेल्याचे व त्या भागात पार्क केल्याचे सतत सहा दिवस केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आढळुन आले. तसेच आरोपींनी एका सफेद रंगाच्या मारुती सुझुकी वॅगनर कार मधुन येऊन वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने मुंबईच्या विविध भागातील सीसीटिव्ही फुटेजवरुन मारुती सुझुकी वॅगनर कारचा नंबर मिळविला. त्यावरुन गुन्हे शाखेने संशयित आरोपी चा मोबाईल नंबर मिळवून त्याचा शोध घेतला मात्र, सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपी वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता, सदर आरोपी खारघरमध्ये असल्याची माहिती मिळाली.  

सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम, व त्यांच्या पथकाने खारघर परिसरात सापळा लावुन मो. अरशद अमजद अली खान (27) व अख्तर अमजद अली खान (25) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली असता, त्यांनी इतर सहकाऱयांच्या मदतीने डिसेंबर 2022 मध्ये तसेच त्यापूर्वी नवी मुंबई पसिरात मोटारकार चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना अटक करुन त्यांनी दिलेल्या माहितीवरुन झाहीद अख्तर अन्सारी (30) व अब्दुल माजी मुसाभाई (42) यांना देखील अटक केली. या चौकडीच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई व मुंबई परिसरातून 15 मोटार कार चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांच्याकडे सखोल चौकशी करुन तब्बल 70 लाख रुपये किंमतीच्या 13 मोटारकार हस्तगत केल्या.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे ई-सिगारेट जप्त