सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे 22 कारटेप हस्तगत  

कारटेप चोरणारा सराईत चोरटा जेरबंद  

नवी मुंबई : रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या बाजुला पार्क असलेल्या कारच्या काचा फोडून कारमधील म्युझिक सिस्टम कार टेप चोरी करणा-या सराईत गुन्हेगारी टोळीतील आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-1 ने अटक केली आहे. अभिषेक अशोककुमार सिंग (30) असे या चोरटयाचे नाव असून त्याने नवी मुंबईच्या हद्दीत केलेले सात कारटेप चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हयातील वेगवेगळया कपंनीचे सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे 22 कारटेप हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी दिली. या टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  

 गत एप्रिल महिन्यामध्ये अज्ञात चोरटयानी पहाटेच्या सुमारास कोपरखैरणे व वाशी परिसरात पार्क असलेल्या 9 कारच्या काचा तोडून त्यातील महागडे म्युझिक सिस्टीम कारटेप चोरी करुन पलायन केले होते. याबाबत कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-1च्या पथकाने या लुटारुंचा देखील माग सुरु केला होता. त्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळाला भेट देतानाच परिसरातील, आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावर खाजगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत संशयित आरोपी हे यामाहा एफ. झेड मोटारसायकलवरुन आल्याचे आढळुन आले. त्यामुळे गुन्हे शाखेने सर्व घटनास्थळावरील डम्प डेटा मिळवुन वाशी व कोपरखैरणे परिसरातील दोन दिवसातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. या तपासणीत दोन्ही आरोपी वाशी टोल नाका मार्गे मुंबईत भेंडी बाजार येथे गेल्याचे आढळुन आले.  

त्यानंतर सदरचे आरोपी पुन्हा त्याच मोटारसायकलने नौपाडा जंक्शन येथून डॉकयार्ड रोड येथे आल्याचे आढळुन आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे व त्यांच्या पथकाने तंत्रिक विश्लेषण करुन तीन्ही आरोपींचे संपर्क क्रमांक निष्पन्न केले. अभिषेक अशोककुमार सिंग हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी सोलापुर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम व त्यांच्या पथकाने सोलापूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने हणमगाव येथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने नवी मुंबई  व मुंबई परिसरात एकुण 7 कारटेप चोरीचे गुन्हे केल्याचे आढळुन आले. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याच्याकडुन सदर गुन्हयातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे 22 कारटेप हस्तगत केले आहेत.
 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

70 लाखांच्या 13 मोटार कार हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश