एपीएमसी वाहतूक शाखा तर्फे अपघात प्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना

एपीएमसी वाहतूक पोलीस शाखाद्वारे एपीएमसी लगतच्या मार्गांवर अपघात प्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना


तुर्भे ः एपीएमसी वाहतूक पोलीस शाखाद्वारे एपीएमसी लगतच्या मार्गांवर अपघात प्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई महापालिका मार्फत अपघात प्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एपीएमसी वाहतूक पोलीस शाखेच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये फळ, भाजीपाला, अन्नधान्य, कांदा-बटाटा, मसाले या बाजारपेठा आहेत. वाशी सेक्टर-१९ मध्ये असलेल्या एपीएमसी बाजारपेठेत प्रतिदिन सरासरी २ ते ३ हजार ट्रक आणि टेम्पो यांची ये-जा असते. याशिवाय एपीएमसी परिसर लगत रहिवाशी वस्तीही पुष्कळ प्रमाणामध्ये आहे. येथील रहिवाशांना मार्केट तसेच वाशी येथे सर्व दैनंदिन कामासाठी ये-जा करावी लागते. त्यामुळे रहिवाशी वस्ती आणि एपीएमसी मार्केट यांच्या मधील तुर्भे- वाशी लिंक मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. तसेच मुंबई आणि उपनगर येथून शेतमाल खरेदीसाठी प्रतिदिन लाखो ग्राहक एपीएमसी मार्केटमध्ये येत असतात.

एपीएमसी भाजी, फळ आणि अन्य मार्केटमध्ये पुणे आणि ठाणेकडून येणाऱ्या वाहनांना वाशी- तुर्भे लिंक मार्गावरील पुलावरुन यावे लागते. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरुन सानपाडा रेल्वे स्थानकासमोरुन एपीएमसी मार्केटकडे वाहने येत असतात.

एपीएमसी मार्केट मध्ये अवजड वाहने भरधाव वेगाने येत असतात. या वाहनांचा वेग अल्प व्हावा आणि दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्ोणे महत्त्वाचे असते. अवजड वाहने वेगाने एपीएमसी परिसरातून जात असल्यामुळे अनेकदा त्यामुळे किरकोळ आणि प्राणांतिक अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना होऊन गेल्या आहेत. परिणामी या पुलाच्या चौकात यापूर्वीही प्लास्टिकचे रंबलर (लहान गतिरोधक) बसवण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते उखडून गेले होते. त्यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढले होते. तसेच एपीएमसी कांदा बटाटा-मार्केट गेट नंबर-२ या ठिकाणी जावक गेट मधून मुंबई दिशेने सर्व मालवाहतूक ट्रक आणि टेम्पो मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. ‘एपीएमसी'चा सिग्नल सुटल्यानंतर अरेंजा कॉर्नर सिग्नलवर वाहनांना थांबायला लागू नये यासाठी भरधाव वेगाने हलकी वाहने जात असतात. परिणामी या ठिकाणीही वारंवार अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सदर दोन्ही ठिकाणी तिन्ही मार्गावर गतिरोधक बसवणे, सिग्नल ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, सिग्नल यंत्रणा चोख ठेवणे या विषयी पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील उपअभियंता विश्वकांत लोकरे आणि सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर नुकतेच या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासह सुरक्षित वाहतुकीसाठी अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनांचा वेग अल्प होऊन येथे अपघाताला आळा बसला आहे. याविषयी पादचारी आणि वाहन चालकांनी नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलीस यांचे आभार मानले आहेत.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दहशतवाद विरोधी पथक, नवी मुंबई युनिट व झारखंड ए. टी.एसची संयुक्त कारवाई