नेरुळ पोलिसांनी दाखविलेल्या कार्यत्परतेचे कौतुक  

गहाळ झालेले साडे पाच लाखांचे दागिने नेरुळ पोलिसांनी 2 तासात काढले शोधुन  

नवी मुंबई : लातूर येथून नेरुळ एलपी ब्रिज येथे उतरलेल्या सुरेखा फुलसे (50) यांची  तब्बल साडे पाच लाख रुपये किंमतीचे 10 तोळे वजनाचे दागिन्यांची बॅग जुईनगर येथे रिक्षाने जाताना गहाळ झाली होती. मात्र नेरुळ पोलिसांनी अवघ्या 2 तासात फुलसे यांच्या दागिन्यांच्या बॅगेचा शोध घेऊन त्यांना ती परत केली आहे. नेरुळ पोलिसांनी दाखविलेल्या कार्यत्परतेमुळे गहाळ झालेले दागिने फुलसे यांना परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.  

जुईनगर सेक्टर-25 मध्ये राहणाऱया सुरेखा उत्तम फुलसे (50) या आपल्या मूळ गाव लातूर येथून रविवारी सकाळी एल पी ब्रीज येथे उतरल्या होत्या. तेथून त्या रिक्षाने जुईनगर येथे आपल्या घरी गेल्यानंतर त्यांची सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर दागिन्यांची बॅग रस्त्यामध्ये अथवा रिक्षामध्ये विसरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ नेरुळ पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. नेरुळ पोलीस ठाण्यातील ड्युटीऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे, पोलीस शिपाई गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये व बीट मार्शल लहानगे यांनी सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ नेरुळ एलपी ब्रीज येथील घटनास्थळाला भेट दिली.  

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हि फुटेजच्या मदतीने फुलसे ज्या रिक्षातुन आपल्या घरी गेल्या होत्या, त्या बाबू प्रेमसिंग चौहान या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी केली. मात्र त्याच्याकडुन काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर फुलसे ज्या मार्गाने रिक्षातून आपल्या घरी गेल्या, त्या मार्गातील सीसीटीव्ही कॅमे-यांची पोलिसांनी तपासणी केली. यातील एका सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये फुलसे यांची एक बॅग रिक्षातून रस्त्यावर पडताना व ती बॅग तेथील एक व्यक्ती घेऊन जाताना निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा सानपाडा परीसरात शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला रस्त्यात बॅग भेटल्याचे सांगून ती बॅग त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली.  

यावेळी पोलिसांनी फुलसे यांच्या समक्ष सदर बॅग तपासली असता, त्या बॅगेत 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 10 तोळे सोन्याचे व 10 तोळे चांदीचे दागिने तसेच 16 हजार रुपये रोख रक्कम असल्याचे आढळून आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे व अंमलदारांनी फुलसे यांची दागिने व रोख रक्कम असलेली बॅग त्यांना परत केली. फुलसे यांचे गहाळ झालेले दागिने व रोख रक्कम अवघ्या 2 तासात भेटल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी दाखविलेल्या कार्यत्पर्तेमुळे गहाळ झालेले दागिने व रोख रक्कम परत मिळाल्याने फुलसे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 एपीएमसी वाहतूक शाखा तर्फे अपघात प्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना