जेएनपीटी बंदरात कंटनेरमधून २४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त

डीआरआय मुंबई विभागाची कारवाई  

नवी मुंबई ः ‘डीआरआय'च्या (महसूल गुप्तचर संचालनालय) मुंबई विभागीय पथकाने जेएनपीटी बंदरात परदेशातून तस्करी करुन आणण्यात आलेला एक संशयित कंटेनर पकडून त्यातून तब्बल २४ कोटी रुपये किंमतीचा १.२ कोटी विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ‘डीआरआय'च्या पथकाने सदर विदेशी सिगारेटचा साठा आयात करणाऱ्यासह एकूण पाच जणांना अटक केली आहे.  

न्हावा-शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका संशयित कंटनेरबाबत ‘डीआरआय'च्या मुंबई विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. सदर आयात करण्यात आलेल्या संशयित कंटेनर पुढील कार्यवाहीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये ठेवला जाणार होता. त्यामुळे या कंटेनरच्या हालचालींवर ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवले होते. सदर कंटेनर जेएनपीटी बंदरातून बाहेर पडल्यानंतर तो कंटेनर अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये जाण्याऐवजी कंटेनर एका खाजगी गोडाऊनमध्ये नेण्यात आला. त्यामुळे सदर कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी सदर संशयास्पद कंटेनर खाजगी गोडाऊनमध्ये अडवला. त्यानंतर ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी सदर ४० फुटी कंटेनरची तपासणी केली असता, त्यात विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला.  

सदर कंटेनर मध्ये विविध ब्रँडच्या विदेशी सिगारेटच्या एकूण १.०७ कोटी विदेशी सिगारटेचे स्टिक आढळून आले. त्यानंतर ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी अधिक तपास केला असता, त्याच गोडाऊनमधून यापूर्वी विदेशी सिगारेटची तस्करी करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ‘डीआरआय'या पथकाने सदर गोडाऊनमधून विविध ब्रँडच्या १३ लाख विदेशी सिगारेटचा आणखी एक साठा जप्त केला. सदर कारवाईत ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी एकूण १.२ कोटी विदेशी सिगारेटच्या स्टिक्स जप्त केल्या असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य अंदाजे २४ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी ‘डीआरआय'च्या पथकाने सदर विदेशी सिगारेटचा साठा आयात करणाऱ्यासह एकूण ५ जणांना अटक केली.  

विदेशी सिगारेटची तस्करी करणाऱ्या टोळीने कस्टम अधिकाऱ्याना चकवा देण्यासाठी सदर कंटेनर खाजगी गोडाऊनमध्ये नेऊन त्यातील विदेशी सिगारेटस्‌चा साठा कंटेनरमधून काढून त्याऐवजी ज्या वस्तुंच्या नावाने विदेशी सिगारेटची आयात करण्यात आली होती, त्या वस्तू सदर कंटेनरमध्ये भरण्यात येणार होते. त्यानंतर तो कंटेनर अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये ठेवण्याची सदर टोळीची योजना होती. त्यामुळे या टोळीने सदर गोडाऊनमध्ये कंटेनरमध्ये भरण्यासाठी विविध वस्तुंचा साठा पूर्वीपासूनच करुन ठेवल्याचे ‘डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळ पोलिसांनी दाखविलेल्या कार्यत्परतेचे कौतुक