बनावट वस्तूच्या नावाखाली तस्करी 

३ कोटींचा ई-सिगारेट साठा जप्त
 

नवी मुंबई ः पाण्याच्या बाटल्या, चुंबकीय बटणे, बेल्ट-बकल्स असल्याचे भासवून परदेशातून आणण्यात आलेला तब्बल ३ कोटी रुपये किंमतीचा ४५,६८६ ई-सिगारेटस्‌चा साठा असलेला ४० फुटी कंटेनर जेएनपीटी कस्टम विभागाने जप्त केला आहे. दरम्यान, सदर सिगारेटचा साठा कुणी मागवला? याबाबत कस्टम विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.  

परदेशातून येणाऱ्या एका ४० फुटी कंटेनरमधून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात येणाऱ्या ई-सिगारेटची माहिती जेएनपीटी कस्टम विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे १२ मे रोजी जेएनपीटी बंदरात आलेल्या एका संशयित ४० फुटी कंटेनरची कस्टम विभागाने तपासणी केली असता, त्यात ई-सिगारेटचा मोठा साठा आढळून आला. अधिक तपासणीत सदर कंटेनरमध्ये ४५,६८६ ई-सिगारेटस्‌ आढळून आल्या असून या ई-सिगारेटच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटी इतकी आहे.  

कस्टम विभागाने केलेल्या तपासणीत सदर कंटेनरमधून पाण्याच्या बाटल्या, चुंबकीय बटण, बेल्ट-बकल्स या वस्तुच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक सिगारेटस्‌ आयात करण्यात आल्याचे आढळून आले आहे. यासंबंधी २०१९च्या कायद्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवण आणि जाहिरात करण्यास प्रतिबंधित आहे. त्यामुळे कस्टम विभागाने सदर ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. आता ई सिगारेटचा साठा कुणी  मागवला याबाबत कस्टम विभागाकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

जेएनपीटी बंदरात कंटनेरमधून २४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त