दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात

सर्व खाजगी, शासकीय कार्यालय, महाविद्यालयात हेल्मेट सक्ती

वाशी ः दुचाकी वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली असून, देखील काही मोटारसायकल चालक या नियमाला बगल देत विना हेल्मेट प्रवास करत असतात. त्यामुळे हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालय तसेच महाविद्यालय विद्यार्थी या सर्वांना विना हेल्मेट प्रवास न करण्याच्या सूचना देऊन नोटीस नवी मुंबई आरटीओ जारी करणार आहे. या संबंधीचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नवी मुंबई आरटीओ विभागाला दिले आहेत. ‘नवी मुंबई आरटीओ'च्या नवीन इमारतीचे काम बघण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पाहणी दौरा केला. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सदर आदेश दिले.

 राज्यात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत असतात. या अपघातांमध्ये डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे दुर्देवाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा असा नियम आहे. मात्र, हेल्मेट घालण्याचा नियम असून देखिल आज दुचाकीस्वार विना हेल्मेट रस्त्यावरुन सुसाट वाहने चालवित आहेत. वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबई शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे.

 नवी मुंबई शहरात यंदा अपघातांची संख्या कमी आहे. परंतु, मृत्यू पावलेल्या व्यवतींमध्ये दुचाकीस्वार आणि विना हेल्मेट मोटार सायकल चालविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. परिणामी नवी मुंबई शहरातील सर्व खासगी कंपन्या, महाविद्यालये, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणी कर्मचारी, विद्यार्थ्यांना हेल्मेट घालूनच प्रवास करावा याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिले आहेत.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नवी मुंबई शहरातील सर्व कंपन्या, महाविद्यालय यांना दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट घालण्याबाबत सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने लवकरच विविध कार्यालयात हेल्मेट सक्ती बाबत नोटीस जारी करण्यात येणार आहे. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी - आरटीओ, नवी मुंबई. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बनावट वस्तूच्या नावाखाली तस्करी