नवी मुंबई पोलीस दलात निर्भया पथक कार्यान्वित; ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

भविष्यात नवी मुंबई शहराचे वाढणार महत्त्व - उपमुख्यमंत्री

नवी मुंबई ः देशातील बहुतांश शासकीय आणि खाजगी संस्थांची जवळपास ९० टक्के डाटा सेंटर्स नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याशिवाय नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, मेट्रो, बंदर, नैना असे महत्वाकांक्षी प्रकल्प साकारले जात असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहराला मुंबई एवढेच महत्व प्रापत होणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे महत्व वाढताना कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या शहराची आव्हाने देखील वाढणार आहेत. त्यामुळे पयुचरिस्टीक पोलीस दल निर्माण करण्यासाठी नवी मुंबई पोलीस पुढाकार घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी मध्ये बोलताना व्यक्त केला.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्टेशनस्तरावर पिडीत महिलांच्या मदतीसाठी महिला सहाय्य कक्ष सुरु करण्यात आले असून या महिला सहाय्य कक्षाचे उद्‌घाटन तसेच नेरुळ, सेक्टर-७ मधील सावली सेंटर मधील महिला सुरक्षा प्रकल्प आणि त्याच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ मे रोजी संपन्न झाले. तसेच वाशी मधील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकातील वाहनांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी आ. गणेश नाईक, आ. सौ. मंदाताई म्हात्रे, आ. रमेश पाटील, आ. महेश बालदी, प्रसिध्द सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशन जावळे, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश  देशमुख  आदि उपस्थित होते.  

काही वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया घटनेनंतर देशात महिला सुरक्षेचा मुद्दा गाजला होता. त्यामुळे देशात महिला अत्याचार संदर्भातील कायद्यांमध्ये बदल करण्यात आले. परंतु, मुंबई शहरात महिला रात्री-अपरात्री एकट्याने प्रवास करु शकतात. त्यामुळे महिला सुरक्षेचा विचार करता मुंबई शहर देशातील इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठी सुरक्षित मानले जाते. आज नवी मुंबई पोलिसांनी देखील महिला सुरक्षेला प्राधान्य देतानाच महिलांच्या सुरक्षा संदर्भात विविध उपक्रम हाती घ्ोतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि संपूर्ण नवी मुंबई पोलीस दलाचे यावेळी अभिनंदन केले.

वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे पोलिसांसाठी एक आव्हान असून स्मार्ट पोलिसींगसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. विविध माध्यमातील प्रतिसादाचे विश्लेषण करुन निर्णय घ्ोता आला पाहिजे. असे असले तरीही सोशल मिडीया आणि डिजीटल मिडीयाने पोलिसांसमोर आव्हाने उभी केली आहेत. परिणामी, भविष्यात सायबर युनिट समोर आव्हाने उभी राहणार असून सायबर फॉरेन्सिक महत्वाचे ठरणार आहे, असेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर महाराष्ट्र पोलीस दलाने आधुनिकतेची कास धरली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील ७ मोठ्या शहरांमध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली असून इतर शहरांसाठी देखील सीसीटिव्ही यंत्रणा उभारणीचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या माध्यमातून इतर गुन्ह्यांसह महिला अत्याचार संदर्भातील गुन्ह्यांवर विशेष लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे लंडन पोलिसांप्रमाणे आपल्या राज्यात देखील खाजगी संस्था आणि आस्थापनांकडील सीसीटिव्ही यंत्रणा शासनाच्या अथवा पोलिसांच्या कंट्रोल रुमशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी यावेळी दिली. यावेळी सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी आपत्कालीन मदतीसाठी असणाऱ्या ११२ या हेल्पलाईन बाबत अधिक जनजागृती करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या ११२ हेल्पलाईन, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र महिला सहाय्य कक्ष, निर्भया पथक सुरु करण्यासंदर्भातील उद्देश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. आज नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकामध्ये १० एर्टिगा, ४० होन्डा ॲक्टीव्हा स्कुटर सशस्त्र महिलांसह महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास गस्त घालणार असल्याचे भारंबे यांनी सांगितले. तसेच येत्या २ महिन्यात आणखी १०0 एर्टिगा आणि २ होन्डा ॲक्टीव्हा नवी मुंबई पोलीस दलात दाखल होणार असल्याचे पोलीस आयुवत म्हणाले.

सदर कार्यक्रमात निर्भया पथकातील वाहने घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना सहकार्य करणाऱ्या रोहित शेट्टी, श्रीरंग आठल्ये, के. आर. गोपी (स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन), सुधीर भंडारे (सॅन्डोज), गुरपाल सिंग उपपर (सुल्झर पम्पस्‌), किशोर भतिजा (रहेजा माईन्डस्पेस), संजीव कौल (लुब्रिझॉल), जगदीश खुलारिया (नरसिंग असोसिएटस्‌) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात