तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या बुलेट व पल्सर मोटारसायकल चोरणारे त्रिकुट जेरबंद

20 लाख रुपये किंमतीचे 20 मोटरसायकल हस्तगत करण्यात नेरुळ पोलिसांना यश

नवी मुंबई : तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेट व बजाज पल्सर-220 या मोटारसायकलची चोरी करुन त्याची सातारा भागात विक्री करणाऱया त्रिकुटाला नेरुळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. या त्रिकुटाने नेरुळ भागातून 20 मोटारसायकल चोरल्याचे तपासात उघडकीस आले असून या गुह्यातील 8 रॉयल इनफिल्ड बुलेट व 10 बजाज पल्सर-220 तसेच इतर 2 अशा एकुण 20 लाख रुपये किंमतीच्या 20 मोटारसायकल हस्तगत करण्यात नेरुळ पोलिसांना यश आले आहे. या त्रिकुटाकडुन आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

नेरुळ पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये गौरव आनंदा कदम (19), निमेश सोपान कांबळे (21) आणि प्रथमेश राजु सपकाळ (21) या तिघांचा समावेश असून यातील गौरव कदम हा सराईत चोरटा असून तो रस्त्यालगत पार्क करुन ठेवलेल्या बुलेट व पल्सर मोटारसायकलचे हॅन्डल लॉक काही क्षणात तोडून अथवा त्यांच्या चावीचे केबल कट करुन डायरेक्ट मोटारसायकल सुरु करुन चोरुन नेत होता. त्यानंतर सदर मोटारसायकल तो व त्याचे इतर मित्र सातारा भागात विकुन मिळालेल्या पैशातून मौज मजा करत होते. अशाच पद्धतीने या त्रिकुटाने नेरुळ भागातून अनेक मोटारसायकल चोरुन त्या सातारा सह विविध भागात विकल्या होत्या. मोटारसायकल चोरीच्या गुह्यात वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना आदेश दिले होते.  

त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताजानी भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले व त्यांच्या पथकाने तपास सुरु करुन वाहन चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमे-याचे फुटेज मिळवुन त्यांची पडताळणी केली. तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपींची माहिती मिळविली. त्यानंतर पोलिसांना शिरवणे भागात राहणा-या गौरव कदम याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिरवणे भागातून गौरव कदम याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने व त्याचे साथीदार निमेश आणि प्रथमेश या तिघांनी मिळून नेरुळ भागातुन अनेक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गौरव व त्याचे मित्र निमेश आणि प्रथमेश या तिघांना अटक करुन त्यांनी चोरलेल्या व दुस-या व्यक्तींना विकलेल्या 20 मोटारसायकल विविध भागातून हस्तगत केल्या.  
 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलीस दलात निर्भया पथक कार्यान्वित; ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण