अनधिकृत बांधकामांची नवी मुंबई शहरात स्पर्धा
अनधिकृत बांधकामात कोपरखैरणे विभाग आघाडीवर ?
वाशी ः नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकाम करण्यात जणू स्पर्धाच लागली असून, यात कोपरखैरणे विभागाने आघाडी घ्ोतली आहे. नुकतीच ‘सिडको'ने अनधिकृत बांधकामांची यादी प्रसिध्द केली असून, कोपरखैरणे विभागात ८९ अनधिकृत बांधकामे जाहीर केली आहेत. मात्र, सद्यस्थितीत अतिरिक्त बांधकामे सुरु असून, राजकीय दबावापोटी बड्या भूमाफियांची बेकायदा बांधकामे दडवली जात असल्याची चर्चा नवी मुंबई महापालिका वर्तुळात सुरु आहे.
नवी मुंबई शहरात महापालिका आणि सिडको अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. या अनधिकृत बांधकामांवर महापालिका आणि सिडको प्रशासनाकडून नोटिसा बजावून कारवाई केली जाते. मात्र, यातील बहुतांश कारवाया या संशयास्पद आहेत. कारण फक्त कागदी घोडे नाचवण्यासाठी दिखाव्याची कारवाई केली जाते. महापालिका आणि सिडको अधिकारी वर्गाची पाठ फिरताच पुन्हा कारवाई केलेली बेकायदा बांधकामे उभी राहतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांची नवी मुंबई शहरात स्पर्धा लागली आहे.
‘सिडको'ने अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १ ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या पाच महिन्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २७७ अनधिकृत बांधकामे जाहीर केली आहेत. त्यात सर्वाधिक कोपरखैरणे विभागात ८९ अनधिकृत बांधकामे असून, त्या खालोखाल घणसोली विभागात ७२ बेकायदा बांधकामे आहेत. मात्र, प्रत्यक्षात ‘सिडको'ने दिलेल्या यादी पेक्षा अतिरिक्त अनधिकृतबांधकामे आज सुरु आहेत. राजकीय दबावापोटी बड्या भूमाफियांची बांधकामे दडवली जात असल्याची चर्चा नवी मुंबई महापालिका वर्तुळात सुरु आहे. अनधिकृत बांधकामांबाबत कोपरखैरणे अतिक्रमण विभाग आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालय अतिक्रमण विभागात सविस्तर माहिती मागितली असता एकमेकांकडे बोट दाखवत माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आली.