वाशी सेक्टर-17 मधील मधुबन लेडीज बारवर वाशी पोलिसांची कारवाई

वाशीतील मधुबन लेडीज बारवर पोलिसांचा छापा   

नवी मुंबई : पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरु असलेल्या वाशी सेक्टर-17 मधील मधुबन लेडीज बारवर वाशी पोलिसांनी शनिवारी पहाटे कारवाई करुन बारमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अश्लिल हावभाव व अंगविक्षेप करणाऱया 26 महिला वेटर तसेच 22 ग्राहकासह बार मॅनेजर, कॅशीयर अशा एकुण 48 व्यक्तींवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.    

नवी मुंबई शहरातील अनेक लेडीज बार व सर्व्हीस बार हे ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बार चालवुन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे तसेच अनेक बारमध्ये महिला वेटरकडुन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य करण्यात येत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वप्रकारच्या अवैध धंद्यावर व बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या कृत्यावर कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी नवी मुंबई शहरातील सर्व बारची झाडाझडती सुरु आहे.  

शुक्रवारी मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या वाशी सेक्टर-17 मधील मधुबन या लेडीज मध्ये महिला वेटर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी गैरकृत्य करत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोडे व त्यांच्या पथकाने सदर बारमध्ये जाऊन पहाणी केली असता, बारमधील महिला वेटर या ग्राहकांसमोर अश्लिल हावभाव, अंगविक्षेप करत असल्याचे दिसुन आले.  

तसेच बार मधिल मॅनेजर व कॅशीयर हे महिला वेटर यांना ग्राहका जवळ बसण्यासाठी सांगून त्यांच्यासोबत अंगलट करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे देखील आढळुन आले. त्यानंतर वाशी पोलिसांनी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सदर बारवर छापा मारुन तोकडे कपडे घालुन ग्राहकांसमोर अश्लिल हावभाव, अंगविक्षेप करणाऱया 26 महिला वेटर, तसेच त्यांना प्रोत्साहन देणारा मॅनेजर,कॅशीयर तसेच 20 ग्राहक अशा एकुण 48 लोकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.  
 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनधिकृत बांधकामांची नवी मुंबई शहरात स्पर्धा