मुख्य सचिव, शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, खारघर पोलीस, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी

खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणी ‘आप'ची न्यायालयात धाव
 

नवी मुंबई ः खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल न केल्याबद्दल ‘आम आदमी पार्टी-महाराष्ट्र'च्या वतीने पनवेल कोर्टात धाव घेण्यात आली असून यासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या २६ मे रोजी होणार आहे.

१६ एप्रिल रोजी खारघर येथे झालेल्या ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धम्रााधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या शासकीय सोहळ्यावेळी १४ श्री सदस्यांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे मृत्यू तसेच अनेकजण जखमी आणि आजारी पडण्याचा अनर्थ झाला. सदर दुर्घटनेबाबत १८ एप्रिल रोजी सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार ‘आप-महाराष्ट्र'तर्फे खारघर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. या संदर्भात खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रे देऊन सुध्दा खारघर पोलिसांकडून काहीच कृती न झाल्याने ‘आप'च्या वतीने २४ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लेखी स्मरणपत्र देण्यात आले. पण, त्यानंतरही काहीच कृती न झाल्याने ‘आप-महाराष्ट्र'च्या वतीने नाईजास्तव पनवेल कोर्टात धाव घेण्यात आली. ‘आम आदमी पार्टी-महाराष्ट्र'चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली असून यामध्ये त्यांनी मुख्य सचिव, शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, खारघर पोलीस तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी केले आहे.

देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्रीगण, मान्यवर उपस्थित असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. हवामान खात्यातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत ४३ अंश कडक उन्हात लाखो लोकांना या सोहळ्यासाठी बसविण्यात आले. सदर सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी अत्यंत बेजबाबदारपणे तसेव पेंडॉल,प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयी शिवाय आयोजित करण्यात आला. सरकार तर्फे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे पोस्टमॉर्टेम करण्यात सुध्दा हलगर्जी करण्यात आली, असे मुद्दे ‘आप'तर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारअर्जात नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकरणात प्रतिवाद्यांविरुध्द तक्रार दाखल करुन भारतीय
दंड संहिता कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आणि इतर गुन्हे दाखल करण्यात यावे. कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, न्यायालयाने पोलिसांना सदर दुर्घटनेचा सखोल चौकशी अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत. मृत्युमुखी पडलेल्या १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जखमींना १० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील ‘आम आदमी पार्टी-महाराष्ट्र'तर्फे करण्यात आली
आहे.

दरम्यान, याप्रकरणी न्यायालयामध्ये  ‘आम आदमी पार्टी-महाराष्ट्र'च्या लीगल टीम मधील ॲड. जयसिंग शेरे, ॲड. सुवर्णा जोशी, ॲड. सादिक शिलेदार ज्येष्ठ वकील ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम बघत आहे. या संदर्भात पनवेल कोर्टात पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे.

पनवेल न्यायालयात याबाबतची केस दाखल झाली असून ३ मे रोजी प्रथम सुनावणी झाली. सदर दुर्देवी घटनेबाबत ठोस कृती न करता राज्य सरकार एक सदस्यीय कमिटी नेमून वेळ काढू उपाय अवलंबित आहे. यावरुन सरकार सदरची दुःखदायक घटना विशष गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होते.-धनंजय शिंदे, राज्य सचिव, आप-महाराष्ट्र.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी सेक्टर-17 मधील मधुबन लेडीज बारवर वाशी पोलिसांची कारवाई