ऍन्ड पायाना व आँरेंज मिंट या दोन हॉटेलमध्ये बेकायदेशीरीत्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई
एपीएमसीतील सत्रा प्लाझामध्ये पहाटे उशीरापर्यंत सुरु असलेल्या 2 हुक्का पार्लरवर कारवाई
नवी मुंबई : एपीएमसीतील सत्रा प्लाझा मधील वेजा ऍन्ड पायाना व आँरेंज मिंट या दोन हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने बेकायदेशीरीत्या सुरु असलेल्या दोन हुक्का पार्लर एपीएमसी पोलिसांनी शुक्रवारी आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करुन हुक्का पार्लर चालक, वेटर व ग्राहक अशा एकुण दहा जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर देखील जप्त केले आहेत.
एपीएमसीतील सत्रा प्लाझा मधील तळ मजल्यावर असलेल्या वेजा ऍन्ड पायना या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेल्या एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एपीएमसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सत्रा प्लाझा इमारतीत तळमजल्यावरील शॉप नं.24 मधील हॉटेल वेजा अन्ड पायाना वर छापा टाकला. यावेळी आतमध्ये काही गिऱहाईक हुक्का ओढत धुम्रपान करत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेलमधील मॅनेजर आणि दोन वेटर या तिघांना ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी मध्यरात्री देखील सत्रा प्लाझा इमारतीत तळमजल्यावर असलेल्या शॉप नं.28 मधील हॉटेल आँरेंज मिंटमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास या हॉटेलवर छापा मारला असता, सदर हॉटेलमध्ये काही तरुण हुक्का ओढण्यासाठी बसल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर व दोन वेटर तसेच 4 ग्राहक अशा एकुण 6 जणांना ताब्यात घेतले.
या दोन्ही हॉटेलमधील मॅनेजर आणि वेटरने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याचे फ्लेवर व हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य ठेवून ग्राहकांच्या जीवीतास आरोग्यास व सुरक्षेस धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पोलिसांनी या दोन्ही हॉटेलचे मॅनेजर आणि वेटर तसेच ह्क्का ओढण्यासाठी बसलेले ग्राहक या 10 जणांविरोधात कोप्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारेच हुक्का फ्लेवर देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रा प्लाझा या व्यावसायीक इमारतीमध्ये बार रेस्टारंट, मसाज पार्लर, हुक्का पार्लर, सलूनच्या नावाखाली विविध प्रकारचे अनैतिक धंदे व गैरप्रकार राजरोसपणे सुरु असल्याचे पोलिसांनी यापुर्वी केलेल्या विविध प्रकाराच्या कारवाईवरुन दिसून आले आहे. पोलिसांनी कारवाई या बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या धंद्यावर कारवाई केल्यानंतर काही दिवसांसाठी हे धंदे बंद केले जातात, मात्र काही दिवसानंतर पुन्हा हे अनैतिक धंदे राजरोसपणे सुरु होत असल्याचे दिसुन येत आहे.