सराईत वाहन चोरटा जेरबंद  

चार चाकी वाहन चोरणारा सराईत वाहन चोरटा जेरबंद  

नवी मुंबई : चार चाकी वाहने चोरणा-या एका सराईत वाहन चोरट्याला पनवेल शहर पोलिसांनी आळंदी येथील त्याच्या घरातून अटक केली आहे. रेवन सोनटक्के (22) असे या चोरट्याचे नाव असून त्याने पनवेल आणि पुणे भागात केलेले चार चाकी वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली.  

पनवेल मधील कोळखे गाव येथील एसबी गॅरेज समोर किशन शिवराम मलगी यांनी आपली होंडा सिटी कार बंद करुन ठेवली होती. मात्र अज्ञात चोरटÎाने सदर कार चोरुन नेली होती. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांची तपासणी केली. या तपासणीत आरोपीने होंडा सिटी कार चोरण्यासाठी वापरलेली एक्स.यु.की.कार घटनास्थळी उभी केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सदर एक्स यु.की. कार बाबत माहिती काढली असता, सदर कार हि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे आढळुन आले.  

त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुफ्त बातमीदाराच्या सहाय्याने अशा प्रकारच्या गुन्हयाची कार्यपद्धती असलेल्या गुन्हेगारांचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांना पुणे आळंदी येथे राहणा-या आरोपी रेवण सोनटक्के याची माहिती मिळाली. मात्र तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक झाले होते. मात्र, तपासादरम्यान आरोपी हा आळंदी येथे येणार असल्याची मिळाल्यानंतर पोलिसांनी केळगाव, आळंदी येथून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी रेवण सोनटक्के याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच वाहन चोरल्याचे कबुल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  


त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने पनवेल भागातुन 2 तसेच पुणे भागातून 2 अशी चार वाहने चोरल्याचे तपासात आढळुन आले. रेवण सोनटक्के हा वाहन चोरण्यात पटाईत असून त्याच्यावर यापुर्वी 13 वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली. न्यायालयाने त्याला 2 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचेही त्यांनी सांगितले.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर वाहन चालकांचे रस्ता सुरक्षेसंबधी प्रबोधन