मार्केट साठी राखीव भूखंडावर भूमाफियांनी उभारले ६ मजली इमले

महापालिकेच्या भूखंडावर भूमाफियांचे अतिक्रमण  

नवी मुंबई ः ‘सिडको'तर्फे नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणाऱ्या सुमारे २७०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर भूमाफियांनी ६ मजली अनधिकृत इमारत उभारल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘सिडको'च्या या भूखंडाची बाजारभाव किंमत किमान ४० कोटींच्या घरात आहे. मात्र, सामाजिक उपक्रमासाठी महापालिकेकडे हस्तांतरीत होणाऱ्या सदर भूखंडाच्या राखीव किंमतीपोटी नवी मुंबई महापालिकेला ७ कोटी रुपये ‘सिडको'ला भरावे लागणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये सदर भूखंडावर मार्केटचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी गत सहा महिन्यांपासून सदर अनधिकृत इमारत तोडण्याची मागणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे करुन देखील त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे या भूमाफियांसोबत साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. सदर अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी केल्यानंतर देखील नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिध्द करताना सुमारे ६३८ भूखंडांवर विविध प्रयोजनासाठी सामाजिक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मात्र, यातील काही भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. घणसोली, सेक्टर-१६ मधील भूखंड क्र.१०६ वरील सुमारे २६८६ चौरस मीटरच्या भूखंडावर महापालिकेने मार्केटचे आरक्षण टाकले होते. मात्र, विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर भूमाफियांनी सदर भूखंड बळकावून त्यावर अनधिकृतरित्या सहा मजली इमारत बांधली आहे. मागील सहा महिन्यांपासून या भूखंडावर सदर इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम सुरु असताना, महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण विभाग झोपा काढत होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा घणसोली गावातील माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी घणसोली गांवच्या आजुबाजुच्या सेक्टर मधील वाढणारी लोकसंख्या आणि नागरिकांची गरज ओळखून घणसोली, सेक्टर-१६ मधील भूखंड क्र.१०६ मध्ये मार्केट व्हावे यासाठी १३ डिसेंबर २०१९ रोजी नवी मुंबई महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये याबाबतचा ठराव मांडला होता. त्यावेळी सदर प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिल्यावर सभागृहाने मुंजरी देखील दिली होती.


त्यानंतर सदर भूखंडावर महापालिकेकडून मार्केटचे आरक्षण टाकण्यात आले असताना, भूमाफियांनी सदर भूखंड बळकावुन त्यावर टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरु केले. याबाबत द्वारकानाथ भोईर यांनी सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, आजतागायत सदर अनधिकृत बांधकामावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागामधील अधिकाऱ्यांचा या अनधिकृत बांधकामाला आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.


विशेष म्हणजे ‘ह्युमन राईटस्‌ कमिशन'ने देखील महापालिकेला या अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले होते. तरी देखील अद्यापपर्यंत या अनधिकृत बांधकामावर कुठलीच कारवाई न झाल्याने आज सहा मजली इमारत या भूखंडावर उभी राहिली आहे. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामाबाबत घणसोलीचे विभाग अधिकारी, उपायुक्त परिमंडळ-२, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख, ‘सिडको'चे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक, ठाणेचे जिल्हाधिकारी या सर्वांना द्वारकानाथ भोईर यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

दरम्यान, यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन सदर अनधिकृत बांधकामावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली असता आयुक्तांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे द्वारकानाथ भोईर यांनी सांगितले. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास थेट उच्च न्यायालयात धाव घेणारअसल्याचे भोईर म्हणाले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बदलीच्या प्रकरणात मनपा लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात