वाशी रेल्वेच्या हद्दीतील हत्या प्रकरणात अल्पवयीन तरुणासह दोघे अटकेत  

वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानका हत्या प्रकरणात अल्पवयीन तरुणासह दोघे अटकेत  

नवी मुंबई : वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानका दरम्यान गत रविवारी रात्री घडलेल्या जितेश बापु बनसोडे (23) या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. जितेशची हत्या त्याच्या दोघा सहकाऱयांनीच जुन्या भांडणाच्या रागातून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी ऐरोलीतून सागर राजु खरटमल (26) व त्याचा 17 वर्षीय अल्पवयीन साथिदार या दोघांना अटक केली आहे.  


या हत्या प्रकरणातील मृत जितेश व त्याची हत्या करणारे त्याचे मित्र सागर आणि अल्पवयीन साथिदार हे तिघेही ऐरोलीत राहण्यास असून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. तसेच ते नियमीत एकत्र नशापाणी करत होते. गत रविवारी रात्री देखील हे तिघे नशा करण्यासाठी वाशी येथे आले होते. यावेळी तिघेही वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली नशा करण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये जुन्या भांडणावरुन वाद झाल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणात झाले. यावेळी एकाने जितेशला ढकलल्या नंतर तो तेथील खड्ड्यात पडून बेशुद्ध झाला. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर दगड घालुन त्याची हत्या करुन पलायन केले होते.  


सोमवारी सकाळी जितेशची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी  अज्ञात मारेकऱयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन मारेकऱयांचा शोध सुरु केला होता. या तपासादरम्या, मृत जयेश हा सागर व अल्पवयीन साथीदारासह नशापाणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गावीत व त्यांच्या पथकाने या दोन्ही आरोपींची माहिती मिळवुन त्यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी केल्यानंतर त्यांनीच जितेशची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

‘तळोजा मध्यवर्ती कारागृह'वर आता ‘ड्रोन'ची नजर