कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात  

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात  

नवी मुंबई : पनवेल येथून महाडला जाणाऱया भरधाव शिवशाही बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत पलटी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू तर इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी प्रवाशांना पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  

एसटी महामंडळाची पनवेल-महाड शिवशाही बस (एमएच-08-इएम-9282) मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास 38 प्रवासी घेऊन पनवेल बस डेपोमधून निघाली होती. सदर बस मुंबई-गोवा महामार्गावरुन जात असताना दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास पनवेल जवळील कर्नाळा खिंडीमध्ये भरधाव वेगात असलेल्या सदर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात घडला. या अपघातामध्ये 38 प्रवाशांपैकी 25 प्रवासी जखमी झाले असून यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी तसेच वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात तसेच कामोठे मधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी रेल्वेच्या हद्दीतील हत्या प्रकरणात अल्पवयीन तरुणासह दोघे अटकेत