नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच

चेन स्नॅचींग करणाऱया लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच असून या लुटारुंनी मागील काही दिवसापासून नवी मुंबईत हैदोस घातला आहे. या लुटारुंनी चार दिवसांमध्ये 3 महिला व 1 पुरुष अशा 4 जणांच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. पोलिसांकडून या लुटारुंचा शोध घेण्यात येत असला तरी, या लुटारुंच्या कारवायात पुन्हा वाढ झाल्याने महिला वर्गात या लुटारुंची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. तर चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडाली आहे.  

नेरुळ मधील शिरवणे गाव येथे राहणारे मिलींद पाईकराव (38) हा गत 7 एप्रिल रात्री 9.30 वाजता घराजवळ असलेल्या राजमहल हॉटेल जवळ फोनवर बोलत उभा होता. यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने पाईकराव यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन पलायन केले. कळंबोली सेक्टर-8 मध्ये राहणाऱया प्रभावती राजे (42) या गत 10 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता वडापावचा स्टॉल बंद करुन पतीसह पायी चालत घरी जात असताना, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने प्रभावाती राजे यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे 12 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले.  

कोपरखैरणे सेक्टर-18 मध्ये राहणाऱया मंजुळा सुन्नाळ (46) या गत 10 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी त्या सेक्टर-23 मधील जामा मस्जीद जवळील रिक्षा स्टँडजवळ आल्या असताना, समोरुन आलेल्या एका लुटारुने त्यांच्या गळ्यातील सोन्याची 70 हजार रुपये किंमतीची चैन खेचुन काही अंतरावर मोटरसायकल घेऊन उभ्या असलेल्या साथीदारासोबत पलायन केले. ठाण्यातील विटावा येथे राहणाऱया रंजना कोकाटे (40) या गत 11 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी ऐरोलीतील पटणी ग्राऊंड येथे गेल्या यहोत्या. यावेळी त्याठिकाणी मोटारसायकलवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील 87 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले.  

या घटनेनंतर नवी मुंबई पोलिसांनी नेरुळ, कोपरखैरणे, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन या लुटारुंचा शोध सुरु केला आहे. मात्र या लुटारुंच्या कारवायात वाढ झाल्याने महिला वर्गात या लुटारुंची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या लुटारुंचा बंदोबस्त करण्याची मागणी महिलावर्गातून होऊ लागली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात