कोपरी गाव मधील खुशबू पान शॉपवर छापा गुटख्याचा साठा जप्त

गुटख्याचा साठा असलेल्या कोपरी गावातील पान शॉपवर पोलिसांचा छापा

नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने शनिवारी दुपारी कोपरी गाव सेक्टर-26 मधील खुशबू पान शॉपवर छापा मारुन सदर शॉपमध्ये साठवणूक करुन ठेवण्यात आलेला सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱया भुल्लन गुप्ता (34) याला अटक केली आहे. तसेच त्याने सदर गुटख्याचा साठा ज्याच्याकडून आणला, त्याचा पोलिसांकडुन शोध घेण्यात येत आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेला भुल्लन गुप्ता हा कोपरी गावात राहण्यास असून त्याचा त्याच भागामध्ये खुशबू पान शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानातून तो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाची छुप्या पध्दतीने विक्री करत होता. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मिशन ऑल आऊट मिशन अंतर्गत गत शनिवारी दुपारी कोपरी गावात असलेल्या भुल्लन गुप्ता याच्या खुशबू पान शॉप दुकानावर छापा मारला.  

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुकानाची तपासणी केली असता, त्याच्या दुकानात प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये साठवणुक करुन ठेवण्यात आलेला सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे व सुगंधित सुपारीचा साठा असल्याचे आढळुन आले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सदर गुटख्याचा साठा जप्त केला. त्यानंतर भुल्लन गुप्ता याच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सदर गुटख्याचा साठा त्याने कोपरखैरणे येथे राहणारा त्याचा मित्र शाहिद याच्याकडुन विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने कोल्हापुर येथून केली अटक