तब्बल 99 लाख 95 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेलेल्या टोळीला वाशी पोलिसांनी केली अटक

घरफोडी करणारी सराईत अंतराज्य टोळी जेरबंद  

नवी मुंबई : वाशी सेक्टर-6 या भागातील रो हाऊस फोडुन त्यातील सोने, हिरे, व इतर मौल्यवान व रोख रक्कम असा तब्बल 99 लाख 95 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेलेल्या आंतरराज्य टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने नवी मुंबईसह इतर भागात केलेले एकुण 13 गुन्हे उघडकीस आले असून या गुह्यातील वाशी सुमारे 30 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

या घरफोडी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये आशीष उर्फ सुरज जिलेदार सिंग (32), राजकुमार लालबहादुर सिंग ठाकुर (42), राजकुमार रामकुमार पांचाळ (43) व पुजा अंकुश जाधव (32) या चौघांचा समावेश आहे. हि टोळी दुपारचे सुमारास अथवा रात्री घरांची अथवा इमारतीची रेखी करत होती. घरात कोणी नसल्याची खात्री झाल्यानंर पाळत ठेवुन घरफोडी करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. अशाच पद्धतीने या टोळीने गत जानेवारी महिन्यामध्ये वाशी सेक्टर-6 मधील बंद रो-हाऊस फोडुन त्यातील सोने, हिरे, व इतर मौल्यवान व रोख रक्कम असा तब्बल 99 लाख 95 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता.  

वाशी पोलीस ठाण्यात याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, निलेश बारसे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे व सी.सी.टि.व्ही फुटेज तसेच तांत्रीक तपासा वरुन आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली होती. या तपासात पोलिसांना 4 संशयीत आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना उत्तप्रदेश व मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी वाशी सेक्टर-6 मधील रो-हाऊसमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली.  

त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक करुन त्यांच्याकडुन वाशीतील घरफोडी प्रकणातील 13 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, 8 लाख रुपयांचे अमेरीकन डॉलर्स, 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण 22 लाख 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला. या आरोपींनी एजाज अब्दुल करीम चौधरी, आनंद राजु पिल्ले उर्फ रजवा यांच्यासह चारचाकी गाडीतुन येऊन सदरची घरफोडी केल्याचे तपासात आढळुन आले आहे. या चौकडींच्या तपासात वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेले इतर 8 गुन्हे उघडकीस आले असून त्या गुह्यातील 7 लाख 52 हजार रुपये किंमतीचा ऐवज देखील हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरुडुन तरुणाचा मृत्यू