पोलीस पत्नी संगीता डवरे यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली
पोलीस पत्नी संगीता डवरे यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवी मुंबई : पोलीस पत्नी संगीता डवरे यांची मृत्यूशी झुंज आठ दिवसांनंतर आज अखेर संपली. पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीत कर्तव्य बजावत असताना अपघातात जखमी झालेले पोलीस हवालदार हनुमंत डवरे यांना न्याय देण्यात पोलीस दल अपयशी ठरले. त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या पत्नी संगीता डवरे यांनी २७ मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात विषप्राशन केले होते. त्यांना प्रथम जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नंतर त्यांना नातेवाईकांनी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या पोलीस पतीला न्याय देण्यासाठी संगीता यांना स्वत:चा जीव द्यावा लागल्याने नवी मुंबई पोलीस दलात संतापाची लाट उसळली आहे.
उलवे नोडमध्ये राहणारे पोलीस हवालदार हनुमंत डवरे नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते सिवूड्स वाहतूक शाखेत कार्यरत असताना १२ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री पामबीच मार्गावरील टी.एस. चाणक्य चौकात नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्री दीडच्या सुमारास सुसाट आलेल्या इनोव्हा कारने नाकाबंदीचे बॅरिकेड्स तोडून डवरे यांना धडक दिली होती. यात त्यांचा हात आणि पायांचा अक्षरश: चुरा झाला. कार चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्यामुळे हा प्रकार घडला होता.
या प्रकारानंतर डवरे यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्याने डवरे यांना दुसऱ्या रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करावे लागले होते. त्यानंतर देखील अपोलो हॉस्पिटल कडून त्यांना पैसे भरण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. त्यानंतर संगीता डवरे यांनी कारचालकावर कठोर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना विनंती केली होती. मात्र त्यांची कोणीच दखल घेतली नाही. त्यांनी न्यायासाठी मंत्रालयाचे उंबरठेही झिजवले. मात्र तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. आपल्या पोलीस पतीला पोलीस दलाकडूनच न्याय मिळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी १५ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही सरकारने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी २८ मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात विषप्राशन केले होते. हा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात येत नसल्याने दुसर्या दिवशी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलवले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन तास
मी पोलीस असूनही मला न्याय देण्यात पोलीस दल अपयशी ठरले. त्याचा जोरदार धक्का माझ्या पत्नीला बसला आणि त्यातून तिने स्वत:चे जीवन संपवले. विषप्राशन केल्यानंतर तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्रालयापासून जे. जे. रुग्णालय तीन किलोमीटर अंतरावर आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दोन तास लावले. संगीताला लोणंद येथील रुग्णालयात दाखल केले असता सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी डॉक्टरवर दबाव आणून तेथून डिस्चार्ज घेण्यास भाग पाडले. त्यामुळे माझ्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संगीता यांचे पती हनुमंत डवरे यांनी केली आहे.