मोटार बाईकच्या गॅरेजवर छापा मारुन एका बाल कामगारांची सुटका

कामोठेतून बालकामगारांची सुटका      

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने कामोठे सेक्टर-20 मधील मोटार बाईकच्या गॅरेजवर छापा मारुन एका बाल कामगारांची सुटका केली. तसेच या बाल कामगाराला कमी वेतनात अति श्रमाचे काम देऊन त्याला राबवुन घेणाऱया गॅरेज मालकांवर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.    

कामोठे सेक्टर-20 परिसरातील एस मोटर्स या मोटार बाईक गॅरेजमध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यात येऊन त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक भरगुडे व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कामोठे येथील एस. मोटर्सवर छापा मारला. यावेळी सदर मोटार गॅरेजमध्ये 16 वर्षे 4 महिने वयोगटातील एक अल्पवयीन मुलगा काम करत असल्याचे आढळून आले.  

त्यामुळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सदर मुलाची सुटका केली. सदर गॅरेज मालक अल्पवयीन मुलाला गेल्या काही महिन्यापासून कमी वेतनात राबवून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने एस मोटर्सचा मालक जितू रामचंद्र पडेकरी (30) याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात बालकांची काळजी व संरक्षण, बाल आणि किशोरवयीन कामगार नियमन व निर्मुलन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशीतील महापालिका रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा