पीडित मुलीची सुखरुप सुटका करणा-या तळोजा पोलिसांचे कौतुक

5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारा आरोपी 4 तासात जेरबंद

नवी मुंबई : तळोजा फेज-1 मध्ये आपल्या घराजवळ खेळत असलेल्या 5 वर्षीय मुलीचे अपहरण करुन फरार झालेल्या आरोपीचा तळोजा पोलिसांनी अवघ्या चार तासात शोध घेऊन त्याच्या तावडीतून अपह्रत मुलीची सुखरुप सुटका केली आहे. प्रमोद महतो (31) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास त्याने या मुलीचे अपहरण केले होते. आरोपीने पीडित मुलीसोबत काही गैरकृत्य करण्यापुर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केल्याने तळोजा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.  

या घटनेतील पीडित मुलीचे वय 4 वर्षे 11 महिने असून ती तळोजा फेज-1 मध्ये आपल्या आई वडिलांसह राहण्यास आहे. बुधवारी सायंकाळी पीडित मुलगी हि आपल्या समवयस्क मैत्रिणीसह इमारतीबाहेर खेळत होती. यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपी प्रमोद महतो याने पीडित मुलीला फुस लावुन तिला आपल्या स्कुटीवर बसवून पळवुन नेले होते. पीडित मुलगी खेळता खेळता परिसरातून अचानक बेपत्ता झाल्याने पीडित मुलीच्या पालकांनी तिची सगळीकडे शोधा शोध सुरु केली होती. मात्र त्यांना मुलगी सापडली नाही. अखेर सायंकाळी 7 च्या सुमारास पीडित मुलीच्या पालकांनी तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले.  

पोलिसांच्या शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांची तपासणी केली असता, आरोपी प्रमोद महतो हा पीडित मुलीला स्कुटीवरुन घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या स्कुटीवरील नंबरवरुन तसेच डॉग स्कॉडच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांकडुन शोधा-शोध सुरु असताना, रात्री 11.30 च्या सुमारास तळोजा येथील मेट्रो कारशेड जवळ आरोपीची स्कुटी व पीडित मुलगी सापडली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेऊन आरोपीचा शोध घेतला असता, त्याच भागात आरोपी प्रमोद महतो हा देखील सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अपहरणाच्या गुह्यात अटक केली. आरोपीने पीडित मुली सोबत कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य केले नसल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मोटार बाईकच्या गॅरेजवर छापा मारुन एका बाल कामगारांची सुटका