स्पर्श स्पा या मसाज सेंटरवर सीबीडी पोलिसांनी छापा मारुन स्पाच्या मालकाला घेतले ताब्यात

सीबीडीतील स्पर्श स्पावर कारवाई  

नवी मुंबई  : मसाजच्या नावाखाली ग्राहकांसोबत अश्लील चाळे करणाऱया सीबीडी सेक्टर-15 मधील स्पर्श स्पा या मसाज सेंटरवर सीबीडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा मारुन चार महिलांना तसेच स्पाच्या मालकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. पोलिसांनी या स्पामध्ये बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई केली. गत तीन महिन्यामधील सीबीडी पोलिसांकडुन अनैतिक धंदे करणाऱया मसाज पार्लरवर करण्यात आलेली चौथी कारवाई आहे.  
 सीबीडी सेक्टर-15 मधील प्रोग्रेसिव्ह लाऊंज इमारतीत असलेल्या स्पर्श स्पा या मसाज सेंटरमध्ये मसाजसाठी येणाऱया ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अधिक पैसे घेऊन त्यांच्यासोबत बीभत्स व अश्लिल चाळे करण्यात येत असल्याची माहिती सीबीडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे व त्यांच्या पथकाने गत सोमवारी सायंकाळी स्पर्श स्पा या मसाज सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.  

त्यानंतर पोलिसांनी सदर स्पावर छापा मारुन मसाज पार्लर चालविणारा चेतन कुटे याच्यासह मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या चार महिला अशा एकुण पाच जणांना ताब्यात घेतले. सदर स्पामध्ये एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली ग्राहकांकडुन अतिरिक्त पैसे घेऊन महिलांकडून ग्राहकांसोबत अश्लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याचे आढळुन आल्यानंतर पोलिसांनी पाचही जणांवर अनैतिक धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.  

सीबीडी पोलिसांनी गत फेब्रुवारी महिन्यामध्ये सीबीडी सेक्टर-15 मधील द मॅजिक मुव्हमेंट या स्पावर छापा मारुन तीन महिलांना ताब्यात घेतले होते. तर जानेवारी महिन्यामध्ये सीबीडी सेक्टर-11 मधील नुका वेलनेस व वेलनेस स्पा या दोन मसाज पार्लवर छापा मारला होता. तसेच या दोन्ही मसाज पार्लरमधून 7 महिला व स्पा चालक अशा एकुण 8 जणांना ताब्यात घेतले होते. यापुर्वी देखील सीबीडीत सुरु असलेल्या मसाज पार्लर व स्पावर सीबीडी पोलिसांनी तसेच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. मात्र त्यानंतर देखील हे मसाज पार्लर आणि स्पा पुन्हा काहि दिवसानंतर सुरु होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ ?