कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

नवी मुंबई: कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात विशेष कारवाई देखील केली जात आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या एकूण १४७६ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, बेशिस्त वाहन चालकांवर होत असलेल्या कारवाई नंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून मार्च महिन्याच्या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे आणि त्यांच्या शाखेतील पोलीस अमंलदारांनी प्रभावी कारवाई केली. त्यात विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारु पिऊन वाहन चालविणे, नो-पाकिग, कर्ण कर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि इतर वाहतुकीचे नियम न पाळणे अशा एकूण १४७६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच सदर कारवाईत १ लाख ६२ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर या पुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी दिली.

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या कारवाई बाबत टि्‌वटर द्वारे प्रतिक्रिया देऊन करुन त्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बाईकच्या अर्धवट नंबरप्लेट वरुन पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत