बिल्डर मंजेरी यांच्या हत्येचा छडा

बिहार येथील तीन मारेकऱ्यांना २५ लाखांची सुपारी

नवी मुंबई: नेरुळमध्ये १५ मार्च रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या सावजीभाई मंजेरी या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात नेरुळ पोलिसांना यश आले आहे. सावजीभाई मंजेरी यांची हत्या त्यांच्या मुळ गावामध्ये असलेल्या वर्चस्व वादातून झाल्याचे उघडकीस आले असून त्यांच्या विरोधकांनी बिहार येथील तीन मारेकऱ्यांना  २५ लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास करीत मेहेक जयरामभाई नारीया (२८) आणि मारेकरी कौशलकुमार विजेंदर यादव (१८), गौरवकुमार विकास यादव (२४) आणि सोनूकुमार विजेंदर यादव (२३) या चार आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या हत्या प्रकणात सहभागी असलेल्या इतर ४ आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.  

१५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सावजीभाई मंजेरी नेरुळ, सेक्टर-६ मधील आपल्या ओळखीतील महिलेच्या घरातून येऊन कारमध्ये बसण्यासाठी जात असताना, पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तुल मधून ३ गोळ्या झाडून त्यांची हत्या करुन पलायन केले होते. सदरची घटना पोलीस तपासाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याने पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करुन मारेकऱ्यांचा शोध सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी करुन मारेकऱ्यांनी सदर गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलचा शोध घेतला.  

सदर मोटारसायकलबाबत अधिक माहिती काढून पोलिसांनी गुजरात मधील राजकोट येथे राहणाऱ्या मेहेक जयरामभाई नारीया याला ताब्यात घेलते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर बिहार येथील तिघा मारेकऱ्यांना २५ लाख रुपयांची सुपारी देऊन सावजीभाई मंजेरी यांची हत्या घडवून आणल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मेहेक याला अटक करुन बिहार येथून कौशलकुमार, सोनुकुमार आणि गौरवकुमार या तिघा मारेकऱ्यांना अटक केली. सदरची कामगीरी परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताजानी भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आणि त्यांच्या पथकाने केली, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी २० मार्च रोजी पत्रकार परिषद मध्ये दिली.  

याप्रसंगी सह-पोलीस आयुवत संजय मोहिते, परिमंडळ-१चे पोलीस उपायुवत विवेक पानसरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुवत अमित काळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गावातील वर्चस्ववादातून हत्या...
सावजीभाई मंजेरी यांच्या मुळ गावी गुजरात कच्छमध्ये १९९८ साली बचूभाई धना पटणी याची हत्या झाली होती. त्या हत्या प्रकणात सावजीभाई आरोपी होते. मात्र, त्यावेळी सावजीभाई यांची सदर हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली होती. सदर गोष्टीचा राग त्यांच्या विरोधकांमध्ये होता. त्यानंतर सावजीभाई यांची आपल्या गावात प्रत्येक गोष्टीमध्ये दादागिरी सुरु झाली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये सावजीभाई यांनी आपल्या मुळ गावी विरोधकांच्या नातेवाईकांना आपल्या हस्तकाच्या मदतीने भरचौकात मारहाण केली होती. अशा पध्दतीने सावजीभाई आपल्या गावात वर्चस्व राखून असल्याने त्यांच्या विरोधकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सावजीभाईंचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांमध्ये त्यांच्या विषयी असंतोष पसरला होता. त्यामुळेच त्यांच्या विरोधकांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या ओळखीच्या व्यक्ती मार्फत सावजीभाई यांची हत्या करण्याचा कट रचून २५ लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात आढळून आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई