व्यावसायीक वादातुन हत्या झाल्याचा संशय  

नेरुळमध्ये तीन गोळ्या झाडुन बांधकाम व्यावसायीकाची हत्या

नवी मुंबई : बेलापूर येथील एका बांधकाम व्यावसायीकावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा मारेकऱयांनी तीन गोळ्या झाडुन त्यांची हत्या करुन पलायन केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नेरुळ सेक्टर-6 मध्ये घडली. साहुजी मंजेरी (पटेल) (54) असे हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायीकाचे नाव असून अद्याप या हत्या प्रकरणामागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र गावाकडील असलेल्या वादातुन त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.  

या घटनेतील मृत बांधकाम व्यावसायीक हे साहुजी मंजेरी (पटेल) हे मुळचे गुजरात कच्छ भागातील असून त्यांचे बेलापूरमध्ये घर आणि कार्यालय आहे. साहुजी हे इम्पेरीया ग्रुपचे डायरेक्टर असून ते महिन्यातील 20 दिवस गुजरात कच्छमध्ये तर 10 दिवस नवी मुंबईत राहत होते. नुकतेच ते नवी मुंबईत आले होते. बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास साहुजी मंजेरी हे आपल्या कारमधुन नेरुळ सेक्टर-6 मधून जात असताना, मोटारसायकलवरुन त्यांचा पाठलाग करत आलेल्या दोघा मारेकऱयांनी त्यांना नेरुळ सेक्टर-6 मध्ये गाठून त्यांच्यावर आपल्याकडील रिव्हॉल्वर मधुन तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोघे मारेकरी पसार झाले.  

या गोळीबारात साहुजी मंजेरी यांना तीन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन साहुजी मंजेरी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवुन दिला. नेरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱया विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन नेरुळ पोलिसांसह गुन्हे शाखेकडुन या हत्या प्रकरणातील मारेकऱयांचा शोध घेण्यात येत आहे.  
दरम्यान, या घटनेतील मृत बांधकाम व्यावसायीक साहुजी मंजेरी (पटेल) यांचा मुलगा धिरज साहुजी मंजेरी (पटेल) याचे रसायनी भागात काही बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. गुजरातमध्ये गावातील लोकांसोबत वेगवेगळ्या कारणावरुन साहुजी मंजेरी यांचे वाद होते. गावाकडील लोकांसोबत असलेले वाद या हत्या प्रकरणामागे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बिल्डर मंजेरी यांच्या हत्येचा छडा