एका बांग्लादेशी नागरिकाने आधारकार्ड बनविल्याचे उघड  

खारघर भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेले चार बांग्लादेशी नागरिक अटकेत  

नवी मुंबई : खारघर मधील बेलपाडा भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या  दोन जोडफ्यांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. यातील एक बांग्लादेशी नागरिक हा मागील 10 वर्षापासून भारतात राहत असताना त्याने भारतातील ओळखपत्र आधारकार्ड देखील बनवुन घेतल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने या चौघां विरोधात खारघर पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) व विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्यांच्या विरोधात पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  

मुळचा बांगलादेशी नागरीक असलेला मोहम्मद जिनत शकुर शेख (45) या व्यक्तीची व्हिसाची मुदत संपलेली असताना तो खारघर येथे बेकायदेशीररित्या इतर 4-5 बांग्लादेशी नागरिकांसह वास्तव्य करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार नवी मुंबई युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजु वानखेडे व त्यांच्या पथकाने गत शुक्रवारी खारघर सेक्टर-3 येथील बेलपाडा येथे शोध घेतला असता मोहम्मद जिनत शकुर शेख हा रेखा कान्हा काकडे या महिलेच्या घरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन माहिती घेतली असता, मोहम्मद शेख व  त्याची पत्नी रिपा (35) व मुलगा अलामीन (5वर्ष) तसेच बांग्लादेशी व्यक्ती सुमोन मोहम्मद सलीम चिकदर (25) त्याची पत्नी मुन्नी (22) हे सर्व मागील दोन महीन्यांपासून वास्तव्यास असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद शेख व सुमोन चिकदर या दोघांकडे सविस्तर चौकशी केली असता, मोहम्मद जिनत शकुर शेख हा 10 ते 12 वर्षापूर्वी कामाच्या निमित्ताने घुसखोरीच्या मार्गाने भारतात आल्याचे व त्यानंतर तो हावडा, पश्चिम बंगाल येथून रेल्वेने मुंबईत आल्यानंतर पनवेलच्या नांदगाव येथे राहण्यास असलेल्या त्याच्या ओळखीतील काही बांग्लादेशी व्यक्तीसोबत चार ते पाच वर्षे राहिल्याचे सांगितले.
 त्याच कालावधीत त्याने भारतातील नागरिकांचे ओळखपत्र असलेले आधार कार्ड बनवून घेतल्याचे तसेच त्याच कालावधीत तो तीन वेळेस घुसखोरीच्या मार्गाने बांग्लादेशात जाऊन पुन्हा भारतात आल्याचे देखील त्याच्या चौकशीत उघड झाले. तसेच एक वर्षापुर्वी त्याची पत्नी रिपा हि देखिल मुलासह घुसखोरी करुन भारतात आल्याचे त्याने संगितले. 2019 मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मोहम्मद जिनत हा बांग्लादेशात त्याच्या मुळगावी गेला होता. त्यानंतर त्याने बांग्लादेशतील पासपोर्ट बनवून घेतल्यानंतर सफ्टेंबर 2019 मध्ये तो टुरिस्ट व्हिसावर एक वर्षासाठी भारतात आला होता. त्यानंतर पुन्हा आक्टोबर 2021 मध्ये तीन महिन्याच्या मेडीकल व्हिसावर तो भारतात आला होता. मात्र, त्याच्या मेडीकल व्हिसाची मुदत दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी संपल्यानंतर देखील तो बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे त्याने सांगितले. तर मोहम्मद सुमोन मोहम्मद सलीम शिकदर (25) याच्या चौकशीत आक्टोबर 2022 मध्ये कामाच्या शोधात तो व त्याची पत्नी मुन्नी हिच्यासोबत बांगलादेशातून भारताच्या सीमेवरुन पायी चालत रात्रीच्या वेळी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने या चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.  

 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

पोट रिपॉट हुक्का पार्लरवर नेरुळ पोलिसांचा पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास छापा