ऐरोलीतील एटीएम मशीन फोडून 5 हजार रुपयांची लुट

ऐरोलीतील ठाणे भारत सहकारी बँकेचे एटीएम फोडुन रोख रक्कमेची लुट
 
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-8 ए मधील ठाणे भारत सहकारी बँकेच्या एटीएममध्ये घुसलेल्या एका चोरटयाने सदरचे एटीएम मशीन फोडून त्यातील 5 हजार रुपयांची रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या एटीएमवरील सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी गेला असताना, चोरटयाने संधी साधुन काही वेळात हि लुट केल्याचे आढळुन आले आहे. रबाळे पोलिसांनी या घटनेतील चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
ठाणे भारत सहकारी बँकेची शाखा ऐरोली सेक्टर-8ए मध्ये असून या बँकेला लागुनच एटीएम सेंटर आहे. या एटीएमसाठी बँकेने 24 तास सुरक्षारक्षक ठेवला आहे. गत 6 ते 8 मार्च या कालावधीसाठी या एटीएमवर राजेश्वर प्रसाद या सुरक्षारक्षकाला नेमण्यात आले होते. 7 मार्च रोजी धुलीवंदनच्या दिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास या एटीएम वरील सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी गेला होता. हिच संधी साधुन एक चोरटा ठाणे भारत सहकारी बँकेच्या एटीएममध्ये घुसला. त्यानंतर त्याने एटीएम मशीनचे लॉक तोडुन एटीएम मशीनमधुन 5 हजार रुपयांची रक्कम चोरुन त्याठिकाणावरुन पलायन केले. दुसऱया दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बँक सुरु झाल्यानंतर एटीएम बंद असल्याची तक्रारी काही नागरिकांनी बँकेकडे केली.  
 
त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकाने एटीएममध्ये जाऊन पहाणी केली असता, एटीएमच्या ज्या भागातून पैसे बाहेर येतात, त्या ठिकाणी असलेले लॉक तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एटीएम मधील सीसीटीव्हि ची पहाणी केली असता, धुलीवंदनच्या दिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एटीएममध्ये घुसलेल्या चोरटयाने एटीएमचे लॉक तोडुन त्यातील रोख रक्कम चोरल्याचे आढळुन आले. त्यानंतर बँकेच्या कॅशिअयरने एटीएममधील रोख रक्कमेची तपासणी केली असता, त्यात 5 हजार रुपयांची तफावत असल्याचे आढळुन आले. सदर चोरटयाने एटीएम मशीन फोडुन त्यातील रोख रक्कम चोरल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एटीएम फोडणाऱया अज्ञात चोरटयाचा शोध सुरु केला आहे. 
Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

असंपादित जमिनीवर ‘एमआयडीसी'चे भूखंड वाटपाचे नियोजन