अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील महत्वाचे पंच पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांची साक्ष पूर्ण  

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण

नवी मुंबई ः अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांच्यासोबत केलेल्या लग्नाचे फोटो जे अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये आढळून आले होते, ते १० मार्च रोजी पनवेल सत्र न्यायालयात झालेल्या सर आणि उलट तपासणीदरम्यान उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांनी ओळखले. तसेच ऑडीओ टेप मधील कुरुंदकरच्या आवाजावर देखील टोपे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, सदर खटल्यातील महत्वाचे पंच असलेले पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आणि उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांची साक्ष पूर्ण झाली आहे.  

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर यांच्या लग्नाचे सर्व फोटो तसेच दोघांमधील संभाषणाचे ऑडीओ आणि व्हिडीओ असलेले हार्डडिस्क सोपान टोपे यांच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आले होते. सदर ऑडीओ टेपमधील आवाज अभय कुरुंदकर याचा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले होते. त्यावेळीही टोपे यांनी पंच म्हणून काम केले होते. त्यामुळे टोपे यांच्या साक्षी नंतर ऑडीओ टेपमधील कुरुंदकरच्या आवाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच या खटल्यातील महत्वाचे पंच पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी आपल्या साक्षीदरम्यान एपीआय अश्विनी बिंद्रे यांनी मोबाईल वरुन १४ एप्रिल २०१६ रोजी मेडीटेशनला जात असल्याचे तसेच सिक रिपोर्ट करणार असल्याचा एसएमएस करुन रजेची मागणी केली होती. तो एसएमएस आपण तत्कालीन तपास अधिकारी बईकर यांना फॉरवर्ड केला होता. सदर बाब त्यांनी न्यायालयासमोर खात्रीपूर्वक सांगितली. त्याचबरोबर अश्विनी बिद्रे यांनी २०0 एप्रिल रोजी मुख्यालय सोडण्याची आणि २१ ते २४ एप्रिल या कालावधीत रजेच्या मागणीचा अर्ज केला होता. असे असतानाच १४ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांचा एसएमएस आला होता, ते उपायुवत शेवाळे यांनी उलटतपासणी दरम्यान न्यायालयासमोर सांगितले.  १० मार्च रोजी सुनावणीत न्यायालयात विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत, राजू गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता शिंदे-अल्फान्सो, क्राईम ब्रँचचे अधिकारी-कर्मचारी त्याचप्रमाणे आरोपींसह आरोपीचे वकील हजर होते. आता पुढील सुनावणी येत्या १७ आणि १८ मार्च रोजी होणार आहे.  

न्यायालयात अंगारा उडवून जादुटोण्याचा प्रयत्न...  
दुसरीकडे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात गत आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी आरोपी अभय कुरुंदकर, राजू पाटील यांनी भर न्यायालयात मंत्रतंत्र युक्त अंगारा फुंकल्याने तेथे उपस्थित सर्वच आश्चर्यचकित झाले. आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जादुटोण्याचा आधार घेतल्याची चर्चा यावेळी न्यायालयात होती. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऐरोलीतील एटीएम मशीन फोडून 5 हजार रुपयांची लुट