महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष

नवी मुंबई पोलिसांचा महिलांसाठी अनोखा उपक्रम 

नवी मुंबई : महिलांना शहर सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण कारण्याबरोबरच महिलांच्या समस्या समजून घेणे, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना योग्य न्याय देणे, या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्टेशनस्तरावर महिला सहाय्य कक्ष सुरु करण्यात येत आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरु होणाऱ्या या महिला सहाय्यता कक्षात तक्रारदार पीडित महिलांना निसंकोचपणे तक्रार देता येणार आहे. तसेच महिला सहाय्यता कक्षातील महिला पोलीस अधिकारी अंमलदारांकडुन त्यांना सर्व प्रकारची तातडीने मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येत्या काही दिवसामध्ये नवी मुंबई पोलिसांकडुन सर्व पोलीस ठाण्यात महिला सहाय्य कक्ष सुरु करुन महिलांना एक आगळी वेगळी भेट दिली जाणार आहे.  

पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी गत डिसेंबर महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी नवी मुंबई पोलीस दलाला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलात मोठया प्रमाणात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही सुधारणा देखील केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी नवी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी विविध उपक्रम देखील सुरु केले आहेत. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी आता नवी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला सहाय्य कक्ष सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. 

नवी मुंबई शहरात देखील महिलांची छेड काढणे, लैंगिक छळ अथवा विनयभंग यासारख्या गुह्यात वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. त्याशिवाय वैवाहिक संबध व कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी, पती व नातेवाईक यांच्याकडुन होणाऱया छळांची प्रकरणे वाढली आहेत. अशा प्रकरणात महिलांच्या समस्या समजून घेणे, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना योग्य न्याय देण्याच्या उद्देशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्य कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. या महिला सहाय्यता कक्षामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व 3 महिला पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. पीडित तक्रारदार महिलांची प्रकरणे हातळता यावीत यासाठी पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मागील आठवडाभर तज्ञांकडुन विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

महिला व मुलींच्या संबधातील सर्व प्रकारच्या तक्रारी या महिला सहाय्य कक्षातील महिला अधिकारी कर्मचाऱयांकडुन हाताळले जाणार आहेत. बहुतेक पीडित तक्रारदार महिला या पुरुष पोलीस अधिकाऱयांसमोर लैंगिक छळ, बलात्कार यासारख्या घटनांची माहिती सांगताना संकोच करतात. मात्र महिला सहाय्य कक्ष सुरु झाल्यानंतर महिलांना आता निसंकोच तक्रार करता येणार आहे. महिलांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी चोवीस तास महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने, महिला व तरुणींनी कुठलाही संकोच न ठेवता तक्रारी द्याव्यात, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडुन करण्यात आले आहे.  

महिलांसाठी 24 तास विनामूल्य हेल्पलाईन  
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने महिलांच्या आपत्कालीन मदतीसाठी एक विनामूल्य हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात 24 तास हेल्पलाइन कार्यान्वित राहणार आहे. विशेष म्हणजे या हेल्पलाईनवर संपर्क साधणाऱया महिलांच्या मदतीसाठी महिलांचे पेट्रोलिंग पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे. महिला पेट्रोलींग पथक चार चाकी वाहनातून अथवा स्कुटीवरुन तत्काळ घटनास्थळी पोहोचुन पीडित महिलांना हवी असलेली मदत उपलब्ध करुन देणार आहेत. महिला, मुलींना कोणत्याही क्षणी असुरक्षितता वाटल्यास त्यांना या हेल्पलाइन संपर्क साधता येणार आहे.  मिलींद भारंबे - पोलीस आयुक्त (नवी मुंबई) 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील महत्वाचे पंच पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, उपजिल्हाधिकारी सोपान टोपे यांची साक्ष पूर्ण