विविध गुह्यातील अनेक वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या काही वर्षापासून पडून

 बेवारस वाहनांमुळे सीबीडी पोलिसांची डोकेदुखी वाढली  

नवी मुंबई : सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विविध अपघातातील तसेच विविध गुह्यातील अनेक दुचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या काही वर्षापासून पडून आहेत. सदर वाहन मालकाकडून त्यांची वाहने नेली जात नसल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहन मालकांना त्यांची वाहने घेऊन जाण्याबाबत सूचना केली आहे. अन्यथा सदर वाहनांचा लिलाव करुन येणारी रक्कम सरकार जमा करण्याचा इशारा दिला आहे.  

 
सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विविध अपघातातील वाहने, तसेच विविध गुह्यातील दुचाकी वाहने गेल्या अनेक वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. यात हिरोहोंडा-८, पल्सर-६, यामाहा-१, बजाज पटना-१, ऍक्टीव्हा-४, हिरो मेस्ट्रो-१,  टीव्हीएस स्टार-१, टीव्हीएस-3, स्पेलंडर प्लस-१, बजाज एव्हंटर-१  असे २७ पेक्षा अधिक वाहनांचा समावेश आहे. ऊन, वारा, पावसामुळे यातील काही वाहने गंजुन सडण्यास सुरुवात झाली आहे.  बेवारस स्थितीत सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेली ही वाहने घेऊन जाण्याबाबत वाहन मालकांना पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतर देखील सदरची वाहने घेऊन जाण्यासाठी कुणीच येत नसल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात सदरची वाहने तसेच पडून असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सीबीडी पोलिसांनी या वाहन मालकांना त्यांची वाहने घेऊन जाण्याबाबत आवाहन केले आहे. अन्यथा सदर वाहनांचा लिलाव करण्याचा इशारा दिला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष