मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून करण्यात येत होती वीज चोरी

महावितरणच्या भरारी पथकाने ऐरोलीत पकडली 13.26 लाखांची वीज चोरी

नवी मुंबई : ऐरोली भागात राहणाऱया एका व्यक्तीने वीजेच्या मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून मागील पाच वर्षापासून तब्बल 13 लाख 26 हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. राजेश महाडिक असे या व्यक्तीचे नाव असून महावितरणच्या भरारी पथकाने महाडिकच्या घरगुती वीज मिटरची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महावितरणने त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

गत महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने जास्त उपकरणे वापरणाऱया परंतु वीज बील कमी येणाऱया अशा घरांची तपासणी सुरु केली होती. या तपासणीदरम्यान, ऐरोली येथील अलंकार हाऊसिंग सोसायटीतील रो हाऊस क्रमांक 6 मध्ये राहणारे राजेश महाडिक यांच्या घरात एकापेक्षा जास्त एअर कंडिशनर व इतर विद्युत उपकरणे असताना, त्यांच्या घराच्या वीजेचे युनिट रीडिंग जेमतेम 150 ते 200 इतके येत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांना जेमतेम 2 हजार रुपये इतके विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या वाशी परिमंडळातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे आणि त्यांच्या भरारी पथकाने महाडिक यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या वीजेच्या मीटरची स्थिती संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांच्या विजेचा मीटर जफ्त केला.  

त्यानंतर भरारी पथकाने दुसऱया दिवशी महाडिक यांच्यासमोर मीटर उघडले असता, सदर मीटरच्या सीलमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसविण्यात आल्याचे आढळुन आले. सदरचे रिमोट कंट्रोल सर्किट कोणी बसवले याबाबत महावितरणच्या अधिकाऱयांनी महाडिक यांना अनेकदा विचारले, मात्र त्यांनी त्याबाबत माहिती दिली नाही. जेव्हा एखाद्या सामान्यपणे चालणाऱया मीटरमध्ये छेडछाड करण्यात येते, तेव्हा त्याचे बील अचानक कमी होते. त्यामुळे हि बाब तात्काळ लक्षात येते. परंतु या प्रकरणात, महाडिक यांनी 2018 मध्ये मीटर बसवल्यापासूनच मीटरमध्ये छेडछाड केल्याचा महावितरणच्या अधिकाऱयांना संशय आहे.  

त्यामुळे महाडिक यांनी मार्च 2018 पासून 59 महिने वीजेची चोरी करुन महावितरणचे तब्बल 13 लाख 26 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका महावितरणने त्यांच्यावर ठेवला आहे. सदर या वीज चोरीची रक्कम महावितरणकडे भरण्याबाबत महाडिक यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी सदर रक्कम भरण्यास नकार दिल्याने, गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱयांनी त्यांच्या घराची वीज जोडणी तोडून त्यांच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यात विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी रबाळे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विविध गुह्यातील अनेक वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या काही वर्षापासून पडून