अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त 

बिबटयाची कातडी विकण्यासाठी आलेला आरोपी जेरबंद

नवी मुंबई  : पनवेल भागात बिबटयाची कातडी विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने सापळा लावुन अटक केली आहे. जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु (31) असे या व्यक्तीचे नाव असून गुन्हे शाखेने त्याच्याजवळ असलेली अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त केली आहे. सदर बिबटयाची कातडी त्याने कुठून आणली व तो सदर कातडी कुणाला विकणार होता, याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली.  

पनवेल मधील मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका येथे एक व्यक्ती बिबटया वाघाची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे व त्यांच्या पथकाने वन विभागाच्या अधिका-यांसह गत मंगळवारी रात्री मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका येथे सापळा लावला होता. त्याठिकाणी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु हा संशयास्पदरित्या आला असता, दबा धरुन बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.  त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या सॅकबॅगेची तपासणी केली असता, त्यात बिबटयाची कातडी आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडे बिबटयाची कातडी कुठून आणली, बिबटयाची शिकार कशाप्रकारे केली, याबाबत त्याच्याकडे चौकशी केली. मात्र त्याने त्याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे अडीच लाख रुपये किंमतीची बिबटयाची कातडी जप्त केली. त्यानंतर जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मिटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवून करण्यात येत होती वीज चोरी