पोळी भाजी केंद्रावरील साहित्याची फेसबुकवरुन जाहिरात करणे चांगलेच महागात

फेसबुकवर साहित्य विक्रीची जाहिरात करणे महिलेला पडले महागात
 
नवी मुंबई : पोळी भाजी केंद्रावरील साहित्याची फेसबुकवरुन जाहिरात करणे पनवेल मधील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने फेसबुकवर टाकलेली जाहिरात पाहुन एका सायबर चोरट्याने सदरचे साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने तिला गुगल पेद्वारे पैसे पाठविण्याच्या बहाण्याने तिच्याकडुन १ लाख ५५ हजार रुपये उकळुन तिची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
 
या प्रकरणात फसवणुक झालेली ३१ वर्षीय महिला पनवेलमध्ये राहण्यास असून तिचा पनवेल भागात पोळी भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. या महिलेच्या पोळी भाजी केंद्रामध्ये उपलब्ध असलेले साहित्य तिला मोठ्या प्रमाणात विकायचे असल्याने तिने गत ४ फेब्रुवारी रोजी आपल्या पतीच्या फेसबुकवर पोळी भाजी केंद्रातील साहित्याची जाहिरात टाकली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनजीत सिंग नामक सायबर चोरट्याने या महिलेला संपर्क साधुन तो मुंबई एअरपोर्ट येथे सीआयएसएफमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे साहित्य खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्याने त्याच्या भावाला देखील त्यांच्यासारखेच हॉटेल काढायचे असून त्याला साहित्य घेण्यासाठी पनवेल येथे पाठवित असल्याचे सांगितले.
 
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भामट्या मनजित सिंग याने या महिलेला संपर्क साधुन त्याच्या सॅलरी अकाऊंटमधून गुगल पेवरुन साहित्याचे २१ हजार रुपये पाठवित असल्याचा बहाणा केला. त्यानंतर संदिप कुमार नामक भामट्याने त्याच्या व्हॉट्सअॅपवरुन या महिलेला क्युआर कोड पाठवुन तो स्कॅन करण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर या महिलेच्या गुगल पेवरुन १० रुपये कट झाले. त्यानंतर भामट्या संदिप कुमार याने सदर महिलेच्या अकाऊंटवर १० रुपये परत पाठवुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सदर भामट्याने या महिलेला २१ हजार रुपये पाठविण्यास संगितले.
 
त्यानुसार या महिलेने २१ हजार रुपये पाठविल्यानंतर सदर भामट्याने या महिलेला तिचे पैसे परत पाठविल्याचे सांगितले. मात्र पैसे अकाऊंटवर न आल्याने या महिलेने त्याला संपर्क साधला असता, त्याने या महिलेला आणखी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने या महिलेला बोलण्यात गुंतवून तिला आणखी पैसे पाठविण्यास भाग पाडुन तिच्या खात्यातून एकूण १ लाख ५५ हजाराची रक्कम काढुन घेतली. युपीआयची मर्यादा संपल्याने पुढील व्यवहार झाले नाहीत. त्यानंतर या महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गुजरात येथून कंटेनर, टेम्पोद्वारे गुटख्याची तस्करी