३० गोण्या भरुन केसरयुक्त विमल पान मसाला व इतर असा गुटख्याचा साठा जप्त

तळोजा येथून टेम्पोमधुन लपवुन नेला जाणारा तब्बल १८ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

नवी मुंबई : तळोजा येथून टेम्पोमधुन घाटकोपर येथे नेला जाणारा सुमारे १२ लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला गुटख्याचा साठा पकडण्याची कामगीरी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. या कारवाईत गुटख्याचा साठा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला अटक करुन गुटख्याचा साठा आणि टेम्पो असा सुमारे १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. सदर गुटख्याचा साठा कुठून आणला, व तो कुणाला विक्री करण्यासाठी नेला जात होता, याचा तपास करण्यात येत असल्याचेही पानसरे यांनी सांगितले.

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गत रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे महापे शिळफाटा मार्गावरील चेक पोस्ट येथे बॅरीकेट लावुन नाकाबंदी सुरु केली होती. यावेळी पोलिसांकडुन संशयीत वाहनांची तपासणी देखील करण्यात येत होती. यादरम्यान सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिळफाटा येथून महापेच्या दिशेने येणारा संशयीत टेम्पो महापे चेकपोस्टवर आला असताना, त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर व त्यांच्या पथकाने सदर संशयीत टेम्पो थांबवुन त्याची तपासणी केली. या तपासणीत टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत केलेला ३० गोण्या भरुन केसरयुक्त विमल पान मसाला व इतर असा गुटख्याचा साठा आढळून आला.

त्यामुळे पोलिसांनी टेम्पो चालकाकडे गुटख्याच्या साठ्याबाबत अधिक चौकशी केली असता, सदर गुटख्याचा साठा त्याने तळोजा येथील खोणी फाटा येथून भरुन तो घाटकोपर येथे पोहोचविण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोमध्ये सापडलेला सुमारे १२ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा व ६ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सामरे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्प चालकाविरोधात अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. सदर गुटख्याचा साठा कुठून आणण्यात आला, व तो कुणाला विक्री करण्यासाठी नेला जात होता, याचा पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोळी भाजी केंद्रावरील साहित्याची फेसबुकवरुन जाहिरात करणे चांगलेच महागात