महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा - आ. गणेश नाईक

नवी मुंबई ः जनतेसाठी आरोग्य आणि शिक्षण अति महत्त्वाचे विषय असून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शहरातील प्रत्येक नोडमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि कर्करोगाचे वाढणारे प्रमाण पाहता महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या विषयांवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत आमदार नाईक यांची नियमित बैठक पार पडली. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, आदि उपस्थित होते.

एमआयडीसी आणि सिडको दोन्ही प्राधिकरणे नवी मुंबई मुळे मोठी झाली. नवी मुंबईमध्ये सोयी सुविधा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये सुविधांसाठी टाकलेली आरक्षणे भूखंड सिडकोणे विकता कामानये. त्याचबरोबर विविध सुविधांसाठी एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरीत केलेले भूखंड एमआयडीसी परस्पर दुसऱ्यांना विकत आहे. त्याला नाईक यांनी विरोध केला असून या प्रश्नावर विधानसभेमध्ये देखील आवाज उठवला होता. सिडको आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदरचा विषय अवगत करुन दिला होता. महापालिका आयुक्तांना ‘सिडको'कडे शहर हितासाठी विषय मांडण्याची सूचना केली होती, असे नाईक म्हणाले.

...तर रोखणार ऐरोली-काटई पुलाचे उद्‌घाटन
मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या ऐरोली-काटई उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. मात्र, या उड्डाणपुलाचा नवी मुंबईकरांना उपयोग व्हावा याकरिता या ठिकाणी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका तयार करण्याची मागणी वेळोवेळी विद्यमान आमदार लोकनेते नाईक यांनी याबाबत वेळोवेळी आग्रही  भूमिका मांडली आहे. ‘एमएमआरडीए'चे अधिकारी सदरचा उड्डाणपुल पूर्ण होण्याअगोदर या दोन्ही मार्गिका बांधून पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन होऊ देणार नाही, असा इशारा सदर बैठकीत देण्यात आला.

कर्करोगाच्या उपचारासाठी ओपीडी...
सिगारेट आणि तंबाखुच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता वेळेवर उपचार भेटत नाहीत या पार्श्वभूमीवर प्रारंभीचे उपचार सुरळीत मिळावेत यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार करणारे बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याची मागणी यावेळी आयुवत नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. तसेच अंगणवाडी आणि आरोग्य सेविकांमार्फत नवी मुंबईमध्ये सर्वेक्षण करुन कर्करुग्णांचा शोध घेण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.

रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा...
महापालिकेच्या रुग्णालयांमधून आवश्यक औषधे उपलब्ध नसतात ती बाहेरुन विकत घेण्यास सांगितले जाते. अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याशिवाय आवश्यक वैद्यकीय चाचण्या देखील रुग्णालयांमधून होत नाहीत. या गंभीर समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधतानाच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत सदरची समस्या दूर करण्याची मागणी नाईक यांनी केली.

प्रत्येक नोडमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा...
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले जाते. शिक्षण व्हिजन अंतर्गत शहरांमध्ये सीबीएसईच्या शाळा सुरू झाल्या. महापालिका शाळांचा पट आणि निकाल उंचावतो आहे. दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मिळावे यासाठी प्रत्येक नोडमध्ये इंग्रजी शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

सीबीएसई शाळांमधून पुरेसा शिक्षकवर्ग नियुक्त करा...
महापालिकेच्या माध्यमातून शहरात सीबीएसईच्या दोन शाळा सुरु आहेत. तसेच अतिरिक्त शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. सीबीएससी शाळांमध्ये प्रवेश
घेण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, अद्याप प्रस्तावित शाळांमधून शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाळा सुरु झालेल्या नाहीत. या शाळांसाठी तातडीने शिक्षकभरती करण्याची मागणी त्यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे  केली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘महालॅन्ड'कडून गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा