आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सीवुडस्‌वासियांशी संवाद

नवी मुंबई ः ‘ंबेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क व्हावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या याकरिता प्रत्येक प्रभागात ‘आमदार आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सीवुडस्‌ येथील नागरिकांशी संवाद साधला. सीवुडस्‌, सेवटर-४८ ए मधील श्री गणेश मैदान येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘सिडको'चे अतिरिक्त मुख्य अभियंता दीपक हरताळकर, महापालिका अधिकारी रमेश राठोड, ‘महावितरण'चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत, सहाय्यक अभियंता अतुल दिघे, शिधावाटप निरीक्षक शीतल लाडके, ‘एनआरआय'चे पोलीस अधिकारी तुषार गुरव, ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री विजय घाटे, ‘भाजपा युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, विनायक गिरी, रणजित निंबाळकर, कविता जाधव, श्रीमती दळवी तसेच सीवुडस मधील शेकडो नागरिक उपस्थित होते.

सदर ‘जनता दरबार'मध्ये सीबीडी-बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज सह मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी, वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना, पार्किंग समस्या, बहुद्देशीय इमारत उभारणे, उद्यानात होणारे अतिक्रमण, अनियमित होणारा पाणी पुरवठा, सीवुडस्‌ क्षेत्रात गर्दुल्ले आणि चोरांचा वाढता वावर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा, परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण-डांबरीकरण, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण, जुन्या मलनिःस्सारण वाहिन्या बदलणे, परिसरातील नवीन शाळेच्या इमारतीला गती मिळणे, प्रवाशांकरिता बसची संख्या वाढवणे अशा अनेक विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी सीवुडस्‌ परिसरातील काही समस्या उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत त्वरित सोडविण्यात आल्या तर काही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सूचित केले. सीवुडस्‌ परिसरात स्लॅब कोसळण्याच्या तसेच इमारतीला तडे जाण्याच्या घटना वारंवर घडत आहेत. याबाबत मी महापालिका आणी सिडको प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेणार असून लवकरच सदरचा प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच महापालिका, एमएसईबी, रेशनिंग, पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यात येतील, अशी ग्वाही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मागण्या मान्य न झाल्यास शंखनाद मोर्चा काढण्याचा ‘मनसे'चा इशारा