आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत आ.मंदाताई म्हात्रे यांचा बेलापूर मध्ये संवाद

 नवी मुंबई ः बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क व्हावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या याकरिता प्रत्येक प्रभागात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने आमदार आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी आमदार आपल्या दारी
कार्यक्रमांतर्गत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर ग्रामस्थांशी संवाद साधला.

सदर उपक्रमाचे आयोजन बेलापूर गांव तलावाजवळील श्री गणेश मंदिर येथे करण्यात आले. याप्रसंगी बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुवत तथा विभाग  अधिकारी डॉ. मिताली संचेती, ‘महावितरण'चे कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, शिधावाटप निरीक्षक शीतल लाडके, पोलीस निरीक्षक मंगेश बोचकर उपस्थित होते.

यावेळी सीबीडी-बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारण्यात यावे. तसेच बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान उभारण्यात  यावे असे दोन ठराव बेलापूर ग्रामस्थांकडून मांडण्यात आले. सदर ठराव रविंद्र म्हात्रे यांनी ग्रामस्थांतर्फे सुचविले तर माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, बाळकृष्ण बंदरे, नारायण मुकादम, ज्योती पाटील, शैला म्हात्रे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, राम मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप घोसाळकर, समाजसेवक सुभाष गायकवाड तसेच शेकडो ग्रामस्थांनी सदर ठरावाला अनुमोदन दिले.

नवी मुंबईत सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज व्हावे याकरिता संपूर्ण नवी मुंबईतून मागणी होत आहे. आज बेलापूर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारणे, ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान उभारण्याबाबतचा ठराव मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर विकास कामाला समस्त ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्यामुळे सर्वप्रथम मी ग्रामस्थांचे आभार मानते, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांना काहीही लाभ नसलेले नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय बांधण्याकरिता हवा तेवढा पैसा महापालिका खर्च करु शकते. परंतु, काही नतभ्रष्ट नेत्यांच्या सांगण्यावरुन नागरिकांच्या सोयींसाठी निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारणीला विरोध होत आहे. सदर बाब अतिशय खेदाची आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामांच्या निविदा काढल्या जातात, ज्यांचा नागरिकांना काहीही फायदा होत नाही. सदर हॉस्पिटल उभारण्यासाठी सीएसआर निधीची तरतूदही करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एखाद्या कामाला विरोध असल्यास त्या कामाला गती प्राप्त होते. बेलापूर ग्रामस्थांकरिता मी खेळाच्या मैदानासाठी ६ एकर भूखंडाची मागणी केली आहे. लवकरच त्याजागी सुसज्ज असे स्टेडीयम ग्रामस्थांना खेळण्याकरिता निर्माण होणार असून आमदार निधीतून स्वच्छता गृहे, उद्यान, ग्रामस्थांना
व्यावसायिक गाळे उभारून बेलापूर गावही स्मार्ट करणार आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 घणसोली सेवटर-४ मधील नागरी आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करण्याची मागणी