महापालिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेजचा मार्ग मोकळा

 

७ नोव्हेंबर रोजी अंदाजित खर्चाचा तपशील, हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारणीबाबतचे सादरीकरण

नवी मुंबई ः सीबीडी, से-१५ए येथे उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजच्या भूखंडाची रक्कम त्वरित भरावी. तसेच बेलापूर ग्रामस्थांकरिता मैदान उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची ४ नोव्हेंबर रोजी भेट घेतली.

दरम्यान, सदर भूखंड खरेदी रक्कम भरल्यास त्यापुढील प्रक्रिया करण्यास सुलभ होणार असून हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजची उभारणी याचा एकूण अंदाजित खर्च आणि त्याचे सादरीकरण करण्याबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. भूखंड खरेदी केल्यानंतर विविध माध्यमातून सीएसआर निधीची तरतूद करुन हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजची उभारणी करणे शक्य होईल, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बैठकीत आयुवत नार्वेकर यांना सूचित केले.

सदर बैठकीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजसाठी भूखंड खरेदी करण्याचे संकेत दिले असून अंदाजित खर्चाचा तपशील तसेच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारणीबाबतचे सादरीकरण करण्याकरिता येत्या ७ नोव्हेंबर रोजी शिष्टमंडळासह बैठकीला बोलावले आहे. त्यामुळे सीबीडी येथे महापालिकेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच बेलापूर गावातील ग्रामस्थांना हक्काचे मैदान मिळावे याकरिता बेलापूर येथे मैदान उपलब्ध करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली.


नवी मुंबई महापालिका मुख्यालय वास्तू उभारण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या पैशात महापलिका रुग्णालय अद्ययावत केले असते तर हिरानंदानी फोर्टीसला रुग्णालय विकण्याची गरज पडली असती का? तसेच १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात ३०० खाटांचे केवळ एकच महापालिका रुग्णालय आहे. महापालिका हद्दीमध्ये येणाऱ्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये केवळ प्रसुतीचे रुग्ण दाखल केले जात असून बाकी सर्व रुग्ण वाशी मधील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवले जात असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडतो. गोरगरीबांना मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी नेहमीच खाजगी रुग्णालयाची मदत घ्यावी लागते. महापालिका हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षात साधी एमआरआय सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. महापालिका रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या हृदय, मेंदू, किडनी अशा आजारांवर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची यंत्रणा उभारण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आल्यामुळे गरीबांसाठी या सर्व उपचारांसाठी एका अद्ययावत हॉस्पिटलची गरज आहे. शिवाय बेलापूर येथील  रुग्णालय २ वर्षे बंद होते. या रुग्णालयात माझ्या स्थानिक विकास आमदार निधीतून १.५० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे दिल्यानंतर तेथील आरोग्य सेवा सुरु करण्यात आली, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री विजय घाटे, माजी नगरसेवक संपत शेवाळे, अशोक गुरखे, दि.ना.पाटील, भरत जाधव, पांडुरंग आमले, रविंद्र म्हात्रे, मोहन मुकादम, राजू तिकोने, ज्योती पाटील, रवी भगत, जगन्नाथ जगताप, दर्शन भारद्वाज, जयवंत तांडेल यांच्यासह बेलापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

सीबीडी येथे महापालिकेचे स्वतःचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज तयार होत आहे. याकरिता अनेक नेते विरोधाभास निर्माण करीत आहेत. परंतु, सदर विकासकामाला होणारा विरोध माझ्याऐवजी नवी मुंबईच्या जनतेला केलेला विरोध आहे. कोव्हीड काळात डॉक्टर्स, नर्स उपलब्ध नसल्याने तसेच आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे इतर महापालिकांप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज असणे काळाची गरज आहे. सदर हॉस्पिटल निर्माण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. -आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने एकवीरा आई मंदिरात पणत्यांची आकर्षक रोषणाई