रबाळे मधील हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

नवी मुंबई ः ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली असून, रबाळे येथील प्रभाग क्रमांक-११ मधील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत आणि वत्सलाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात नुकताच जाहीर प्रवेश केला. दलित चळवळीतील महिला कार्यकर्त्या वत्सलाताई कांबळे यांनी रबाळे प्रभाग क्रमांक-११ मधील हजारो कार्यकर्त्यांची एकजूट घडवून आणली आहे. रबाळे प्रभाग क्रमांक-११ मधील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्या पक्षांवर नाराजी व्यवत केली.  

गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील गोरगरिबांना मदतीचा हात करुन सहकार्य करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मिळाले नाही. प्रभागातील अनेक समस्यांना तोंड देत आलो. परंतु, कोणत्याही  लोकप्रतिनिधींनी आमची साधी विचारपूस देखील केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमोल फिटर यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासह अजय कलाल, विजय कलाल, मच्छिंद्र सूर्यवंशी, राजू देवकर, सचिन कलाल, श्रीमंत पोळ, विष्णू चव्हाण, रणजीत फमादे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वत्सलाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आम्ही सर्व महिला एकजुटीने काम करणार आहोत, असे यावेळी रुपाली देडे यांनी जाहीर केले. पक्षप्रवेश कार्यक्रमात रुपाली देडे यांच्यासह लताबाई गायकवाड, माया पवार, रेखा कांबळे, मीना कांबळे, लक्ष्मी गोटे, आशा भिंगारे आणि शेकडो महिलांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मनःपूर्वक स्वागत केले. 

 याप्रसंगी माजी नगरसेवक ममित चौगुले, माजी नगरसेवक सुरेश भिलारे, माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेवक गणेश दगडे,  राज धावणे यांच्यासह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कुणाल घरत यांचा वाढदिवसानिमित्त स्टॉल हस्तांतरण, रुग्णवाहिका लोकार्पण