नवी मुंबईचा चेहरा दाखविणारं आपलं नवे शहर वृत्तपत्र
‘आपलं नवे शहर' हे वृत्तपत्र आज खऱ्या अर्थाने वाचकांच्या मनातील ताईत बनले आहे. या वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या सामाजिक माध्यमावर टाकून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आमच्यासारखे अनेक वाचक करीत आहेत. ‘नवे शहर'चा खप जास्तीत जास्त होवो आणि आपल्या या ला़डवया वृत्तपत्राने सुवर्ण महोत्सव व शतक महोत्सव साजरा करावा हीच सदिच्छा.
१ मे रोजी ३१ वा वर्धापन दिन साजरा केलेल्या ‘आपलं नवे शहर' वृत्तपत्रास बंदर व गोदी कामगारांच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या तीन दशकाचा आढावा घेतल्यास आपलं नवे शहर या वृत्तपत्राने नवी मुंबईला खूप काही दिले आहे. आज नवी मुंबईचा भारतात अनेक वेळा दुसरा क्रमांक तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेला आहे. यामध्ये आपल्या वृत्तपत्राचे मोठे योगदान आहे. कारण नवी मुंबईमध्ये स्वच्छता, भिंती रंगविणे, झाडे लावणे, झाडे जगविणे, हरित नवी मुंबई, स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई अशा अनेक योजना नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविल्या जातात. नेहमीच ठीक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमास प्रसिद्धी देण्याचं काम आपलं नवे शहर या वृत्तपत्राने नेहमीच केले आहे. नवी मुंबईतील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय बातम्या देण्यात हे वृत्तपत्र नेहमीच अग्रेसर आहे. कष्टकरी शेतकरी, कामगार, स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण नेहमीच आवाज उठविला आहे. अनेकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या वृत्तपत्राने केलं आहे. वृत्तपत्र हे एक समाजाचा आरसा असते. आरशात पाहिलं तर समाजाचं प्रतिबिंब दिसते.
उपसंपादक राजेंद्र घरत यांनी अनेक नवोदित लेखकांना तयार केले असून, आपलंसं करून घेतले आहे. अनुभवी लेखकांना वारंवार प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केले आहे. राजेंद्र घरत यांचे ‘मुशाफिरी' हे अतिशय सुंदर सदर वाचकांच्या मनात चांगलंच घर करतं. नवे शहर हे एक दर आठवड्याला ‘वाचक संवाद प्रतिक्रिया' हे सदर प्रसिध्द करीत असते. यामध्ये अनेक वृत्तपत्र लेखक सहभाग घेऊन या प्रश्नांवर आपले विचार मांडतात. मलाही या सदरात लिहिण्याची संधी राजेंद्र घरत यांनी दिली. या सदरामुळे समाजातील अनेक महत्त्वाचे विषय वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजासमोर येतात. प्रत्येक आठवड्याला काय प्रश्न आहेत, याची वाचक उत्सुकतेने वाट पाहत असतात, आणि त्यावर लेखन करतात. या सदरामुळे नवे शहर या वृत्तपत्राची नवी मुंबईमध्ये एक वेगळीच प्रतिमा आहे. आमच्यासारखा वाचक वर्ग हे सदर नेहमीच वाचतो आणि वृत्तपत्र लेखकांचे विचार या माध्यमातून आपणास वाचण्यास मिळतात व आपल्या ज्ञानामध्ये भर पडते.
‘वाचकांच्या मनातील वृत्तपत्र' हे नवे शहर या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य आहे. आपल्या ब्रीदवाक्य प्रमाणे चालणारे ‘आपलं नवे शहर' हे वृत्तपत्र आहे. उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ अशा विविध शहरातल्या छोट्या मोठ्या बातम्या देण्याचं काम आपल्या वृत्तपत्रामार्फत होत असते. जाहिरातींना कमी प्राधान्य देऊन समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपल्या दैनिकात होतं, हे फार समाधानकारक आहे. निर्र्भीडपणे लिहिलेला संपादकीय लेख आपल्या दैनिकातून नेहमीच वाचण्यास मिळतो. त्यामुळे आमच्यासारख्या वाचकांच्या ज्ञानामध्ये आणखीच भर पडते. ‘नवे शहर' मध्ये नवी मुंबईच्या बातम्यांना नेहमीच प्राधान्य असते, याशिवाय नवी मुंबईच्या बाहेरील बातम्या देखील आपल्या वृत्तपत्रात वाचण्यास मिळतात. नवी मुंबईत आलेले लोक हे मुंबईतूनच आलेले आहेत. त्यांना मुंबई शहरातील काही बातम्यांची ओढ असते. त्यादेखील आपल्या ‘नवे शहर' वृत्तपत्रातून वाचण्यास मिळतात. आपल्या वृत्तपत्रातील नंदकुमार ठाकूर सारखे अनेक पत्रकार निष्ठेने, चिकाटीने व प्रामाणिकपणे काम करीत असून, आपली भूमिका यशस्वीपणे पार पडतात. भूमिपुत्राच्या बातम्याना नेहमीच प्राधान्य देणार ‘आपलं नवे शहर' वृत्तपत्र आहे. मला अभिमान वाटतो की सानपाड्यामध्ये अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम आपल्या वृत्तपत्रांने केले आहे आणि म्हणूनच आज सानपाड्यांमध्ये नवे शहर वृत्तपत्राचा वेगळा, स्वतंत्र वाचक वर्ग तयार झाला आहे. वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या सामाजिक माध्यमावर टाकून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आमच्यासारखे अनेक वाचक करीत आहेत. ‘आपलं नवे शहर' हे वृत्तपत्र आज खऱ्या अर्थाने वाचकांच्या मनातील ताईत बनले आहे. ‘नवे शहर'चा खप जास्तीत जास्त होवो आणि आपल्या वृत्तपत्राने सुवर्ण महोत्सव व शतक महोत्सव साजरा करावा. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आपल्या संपादकिय मंडळाला, पत्रकारांना व नवे शहर परिवाराला हार्दिक शुभेच्छा! आपल्या वृत्तपत्रामार्फत समाजाची सेवा घडो, समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
- मारुती विश्वासराव, कार्यकारी संपादक : पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंक