'ते' सात पृथ्वीवासी
निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांप्रमाणे जर आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावात एक तरुण जरी पुढे आला तरी रोज नवा इतिहास लिहिला जाईल. माती संस्कृतीसाठी मोठे काम उभे राहणे आवश्यक आहे. असे मोठे काम राज्यातल्या प्रत्येक गावात उभारले जाईल.
कल्याण जवळच्या मुरबाडमध्ये रेखा दळवी नावाच्या आजी राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्या माझे लेख वाचून सातत्याने मला फोन करून, एकदा मी त्यांना भेटावे अशी विनंती मला करीत होत्या. परवा मी आजींना भेटण्यासाठी खास मुरबाडला गेलो होतो. कोणीच नसणाऱ्या आजींनी पुस्तकांना आपलेसे करून स्वतःचे आयुष्य प्रचंड समृद्ध करून घेतले आहे. माझी ७२ च्या ७२ पुस्तके आजीबाईंकडे पाहून मी एकदम अवाक झालो. आजींची भेट घेऊन निघताना रस्त्यात अनेक मुले वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये दंग झाली, असे दृश्य मी पाहत होतो. कोणी मातीचे दागिने बनवत होते. कोणी मातीची भांडी तयार करत होते. कुणी मोठे शिल्प साकारत होते. कोणी चित्र काढत होते. कोणी फोटोग्राफी करत होते. कोणी तबल्यावर गाणं म्हणत रियाज करत होते. कोणी नाटकाची तालीम करीत होते. तिथे असणारा प्रत्येकजण कला, संस्कृती आणि मातीला धरून काम करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही, असे होते. मी तिथे गेलो, त्या सर्वांच्या कामामध्ये सहभागी झालो.ते जे काही प्रवास करीत होते तो प्रवास समजून घेतल्यावर मी एकदम थक्क झालो.
मी आमीर खानचा ‘रंग दे बसंती' चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात आमीर खानचे सर्व मित्र चिरंतर बदलासाठी मोठी लढाई लढतात. आणि अपेक्षित बदल त्यांच्या पदरात पडतो. ‘क्रांती'ची सुरुवात एक व्यक्ती करत असतो, आणि त्या ‘क्रांतीची छोटी ठिणगी सगळीकडे जम बसवते. तसा एकदम बदल होत नाही, पण जो बदल होतो तो चिरंतर टिकणारा होतो. असेच ‘सेम टू सेम' या सात मित्रांनी केले आहे.
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, कलाकार या नात्यातून एका ठिकाणी गुंतलेले सात मित्र कलेसाठी, शाश्वत जगण्याच्या लढाईसाठी एकत्रित येतात. ते जे निर्माण करू पाहत होते, त्याचा होणारा इतिहास हा सोनेरी अक्षराने लिहिला जाणार, याचा कधी कोणी विचारही केला नसेल.
मी ज्या ठिकाणी होतो, तिथे असणारी मौर्विका मला सांगत होती, "प्रत्येक गावात, भागात असणारी कला, तिथली संस्कृती हे तिथली ओळख आहे. ती कायम टिकली पाहिजे. कलेमुळे शिक्षण घेण्यासाठी रुची वाढेल यासाठी अद्भुत प्रयोग आम्ही युवकांनी सुरू केले. ज्यातून हजारो मुले कला संस्कृतीकडे वळली.”
एक एक गाव काबीज करीत या सर्व तरुणांना आता अवघा देश काबीज करायचा आहे. आजही अनेक शाळांत, अनेक गावांत या युवकांना निमंत्रित केले जात आहे. प्रतीक जाधव, मौर्विका ननोरे, राहुल घरत, कल्पेश समेळ, निखिल घरत, प्रतीक्षा खासणीस, निनाद पाटील या सात जणांनी कलेसाठी राज्यभर हाती घेतलेले काम कौतुकाचा विषय ठरले आहे. हे सात जण कला विश्व चळवळीचे नायक आहेत. हे सातही जण मोठे कलाकार आहेत. चित्रकार, फोटोग्राफर, नाट्यकलावंत इतिहासाचा उपासक आदी कलेतले हे उच्चशिक्षित आहेत.
या चळवळीची सुरुवात झाली, प्रतीक जाधव (८९२८६८२३३०) यांच्या चार वर्ष झालेल्या कला प्रवासातून. प्रतीक यांनी २०१९ ते २०२४ या दरम्यान देशभर सायकलवरून प्रवास केला. या प्रवासातून त्यांनी देशभरात असणारी कला, संस्कृती पाहिली, तिचा शोध घेतला. प्रतीक म्हणाला, "मी मूळचा बीडचा, पण आता मुंबईकर झालो. माझे वडील श्रीराम जाधव हे शिक्षक होते. मी सातवीत असताना बाबांचा अपघाती मृत्यू झाला. मी ११ वीमध्ये असतांना माझी आई पंचफुला जाधव हिचे कॅन्सरचे निधन झाले. मी एकटाच होतो. बाकी नातेवाईकांचा मला आधार होता, पण लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभे राहून जगायची सवय लागली. मला चित्रकला, शिल्पकलेमध्ये प्रचंड रुची होती, मी त्यात उच्च शिक्षण घेतले. तेच ते शहरातले जगणे, तीच ती नोकरी हे मला नको होते. त्यातून माझी सायकल यात्रा निघाली. मी सायकलवर भारत का फिरलो तर माझ्याकडे प्रवास करायला पैसे नव्हते. मी जेव्हा चार वर्षांनी परत आलो तेव्हा, काहीतरी वेगळे करायचे या हेतूने आम्ही ‘अर्थियन आर्ट फाऊंडेशन' सुरू केले.” मी प्रतीकला मध्येच म्हणालो, ‘अर्थियन म्हणजे काय?' तेव्हा प्रतीक म्हणाले, "अर्थियन या शब्दाचा अर्थ पृथ्वीवासी असा होतो. निसर्गाशी सुसंगत राहण्यावर आणि मानवांना जोडण्यासाठी माणसा माणसांतील दुभंगलेपण दूर करण्यासाठी आम्ही माणुसकीसाठी गती घेऊ पाहत आहोत. आमच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.” प्रतीक सांगत होता, आणि मी सारेकाही ऐकत होतो.
हे सात मित्र एकत्रित आले आणि त्यांनी कला जोपासण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी रचना आखली आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.
मी आणि प्रतीक बोलत असताना बाजूला एक मुलगा मातीचा मुखवटा बनवत होता. प्रतीक मला म्हणाला, "दादा हा विजय पाते, गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्याशी जोडला गेला आहे. विजयला पूर्वी शाळेत जाण्यात, अभ्यास करण्यात रुची नव्हती. पण जेव्हापासून विजय आमच्या कार्यशाळेत सहभागी झाला, तेव्हापासून त्याच्या शाळा आणि अभ्यासातली रुची वाढली. असे हजारो मुलांविषयी झाले. मुलांना जर कलेमध्ये रुची निर्माण झाली तर आपोआप ते अभ्यासात शाळेत नक्की रुची दाखवतील.” प्रतीक जे जे सांगत होता, ते सारे बरोबर होते. सर्व प्रकारच्या कलेत रुची वाढावी यासाठी पळू येथे ‘अर्थियन आर्ट फाऊंडेशन'ची सुरुवात झाली. येथे उभे केलेलं कला केंद्र गावागावांत उभे राहिले पाहिजे, असे ते मॉडेल होते. येथे मुलांसाठी होणाऱ्या कार्यशाळा, हेरिटेज वॉक, कला सादरीकरण, कला प्रदर्शन, भित्तीचित्रे, स्वछता मोहीम, हे सारेकाही पाहण्यासारखे होते.
त्या साऱ्यांना मला काय दाखवू काय नाही असे झाले होते. पळू या गावामध्ये या सर्व मित्रांनी कला केंद्रासाठी जंग जंग पछाडून तीन एकर जागा घेतली. त्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली. पळू सारखाच उपक्रम आसपासच्या वैशाखरे, सिंगापूर, मांडवत या गावात सुरू केले होते. मी जिथे जिथे या सर्व टीमसोबत गेलो तिथे तिथे या सर्वानी प्रचंड जीव ओतून काम केले होते. मी प्रतीक आणि मौर्विका म्हणालो, तुमच्याकडे जे काही होते ते पदरमोड करून तुम्ही हे सारे उभारले. एक पुढची पिढी घडवण्याचे काम तुम्ही करताय, आता पुढे कसे करणार? त्यावर मौर्विका म्हणाली, माहिती नाही. काम खूप मोठे आहे, ते पूर्ण होणार आहे, पैशांची प्रचंड अडचण आहे आणि अडचण आहे म्हणून कोणते काम थांबत नाही. या सर्व टीम मधील असलेली तळमळ कमालीची होती. या सर्वांना स्वतःविषयी काही देणेघेणे नाही, सामाजिक क्रांती करायची आहे आणि ती गतीने करायची आहे, हेच या सर्वांचे ध्येय आहे.
आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामधून खूप मोठा सामाजिक आशय माझ्यापुढे येत होता. प्रतीक म्हणाला, जगायला सर्वात महत्वाचे काय लागत असेल तर तो आनंद, समाधान असतो. शहरात हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. गावातल्या प्रत्येक वागणुकीमध्ये तुम्हाला या आनंदाची झुळूक सतत दिसेल. मीठ आणि पेट्रोल सोडून आम्ही सर्व काही घरी बनवू शकतो आणि आम्ही ते करतोय. या निर्मितीचा प्रत्येक विषय कलेशी संबंधित आहे, जो आम्ही प्रत्यक्षात उतरवतो. परवा मला एका आजीचा फोन आला. आजी म्हणाल्या, माझ्या मुलीच्या नावाने तुम्हाला काही पैसे पाठवतो, ती आता या जगात नाही. तिलाही कलाकार व्हायचे होते, असे म्हणत आजी रडायला लागली. असे मदत करणारे अनेक भावनिक हात पुढे येत आहेत.
त्यांचे काम समजून घ्यावे तेव्हढे कमी होते. अवघा दिवस घालवल्यावर मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो. मी विचार करत होतो, इतिहासामध्ये जसा औरंगजेबाला प्रश्न पडला होता, माझ्या अवघ्या टीममध्ये जर एक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा माणूस असता तर मी अजून मोठा इतिहास घडवला असता. तसा प्रश्न या सर्वांना भेटल्यावर, त्यांचे काम पाहिल्यावर मलाही पडला होता. या सात पृथ्वीवासी उत्साहाने, निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या तरुणांप्रमाणे जर आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावात एक तरुण जरी पुढे आला तरी रोज नवा इतिहास लिहिला जाईल. माती संस्कृतीसाठी मोठे काम उभे राहणे आवश्यक आहे. असे मोठे काम राज्यातल्या प्रत्येक गावात उभारले जाईल. बरोबर ना.. ! - संदीप काळे