उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्वच तारू शकते !
जाज्वल्य हिंदुत्वाचे जे रक्त जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या रक्तात आहे ते राज्यातील अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही हे महाराष्ट्राची जनताही जाणते. आज जे हिंदुत्वाच्या मुद्यावर आंदोलने करत आहेत त्यांचीही नाळ शिवसेनेशीच जोडलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या पक्षांना आपली जागा दाखवून देण्याची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हीच योग्य वेळ आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच केली. त्यांची ही घोषणा म्हणजे शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे संकेत आहेत असे म्हणायला हरकत नाही. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुका शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढणार असल्याचे जाहीर झाल्यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. स्वबळावर निवडणुका लढवल्यामुळे पक्षाला हानी होते की लाभ हें येणारा काळच ठरवणार असला तरी पक्षाच्या या समंजस भूमिकेमुळे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना मात्र आंनद झाला आहे. हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मुळात ज्या उद्देशाने केली होती आणि ज्या तत्वांच्या आधारावर शिवसेनेचा राज्यासह राज्याच्या बाहेरही विस्तार झाला होता, त्या मूलभूत तत्वांनाच पक्षाच्या महाविकास आघाडीतील प्रवेशामुळे तिलांजली दिली गेली होती. ज्या पक्षांच्या विचारांवर, धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत आसूड ओढले, ज्यांच्यावर टीका करून सभा गाजवल्या, सत्तेच्या हव्यासापोटी त्याच पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसणे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना न पटल्याने ते दुखावले गेले होते. ‘जसे मला संभाळलेत तसे उद्धवलाही सांभाळा' ही स्व. बाळासाहेबांनी जाहीर सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात घातलेली भावनिक साद एकनिष्ठ शिवसैनिकांच्या हृदयात घर करून राहिली; तिचा मान ठेवत आजही असंख्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
सेक्युलर पक्षांची संगत धरल्याने त्यांच्या सोबतीचा परिणाम हळूहळू शिवसेनेच्या पुढील निर्णयांवर, आदोलनांवर आणि भूमिकेवर होताना दिसू लागला. शिवसेनेची खरी ओळख असणारे जाज्वल्य आणि कडवट हिंदुत्व या सर्वांत मागे सरताना दिसलें. मध्यंतरीच्या काळात एकमेकांची उणीधुणी काढताना शिवसेना आणि भाजप यांमध्ये खरे हिंदुत्व कोणाचे यात स्पर्धा रंगताना दिसली. ज्याचा लाभ शिंदेच्या शिवसेनेला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्व केवळ भाषणांतूनच ऐकू येत असल्याने पक्षातील काही कडवट हिंदुत्ववादी शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली आणि धनुष्यबाण हाती घेतला.
महाविकास आघाडीला लोकसभेत घवघवीत यश मिळाले, तरी विधानसभेत मात्र तिला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सर्वातून बोध घेऊन उशिरा का होईना पक्षाने स्वबळाचा नारा देऊन दुखावलेल्या सच्च्या शिवसैनिकांमध्ये संजीवनी भरली आहे. आता अपेक्षा आहे ती सेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा झेंडा हाती घेण्याची. जाज्वल्य हिंदुत्वाचे जे रक्त जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या रक्तात आहे ते राज्यातील अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही हे महाराष्ट्राची जनताही जाणते. आज जे हिंदुत्वाच्या मुद्यावर आंदोलने करत आहेत त्यांचीही नाळ शिवसेनेशीच जोडलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या पक्षांना आपली जागा दाखवून देण्याची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हीच योग्य वेळ आहे. आज राज्यातील हिंदूंना अनेक प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्राधान्याने हाताळायला हवेत. अल्पसंख्यांकांच्या लांगुलचालनाचा पक्षावर लागलेला डाग धुवून काढला पाहिजे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका समोर ठेवून राजकारण करण्यापेक्षा सेनेने ७० टक्के समाजकारण आणि ३० टक्के राजकारण हें पूर्वीचे धोरण पुन्हा एकदा अवलंबायला हवे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर पुढाकार घेऊन, रस्त्यावर उतरून आंदोलने करायला हवीत. पक्षाला सध्या गरज आहे ती साथ सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात वळवण्याची आणि जनमानसांत निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेला पुसण्याची. ही दोन्ही कार्ये हिंदुत्वाचा झेंडा पुन्हा एकदा हाती घेतल्यानेच सिद्धिस जाणार आहेत. मधल्या काळात शिवसेनेने घेतलेल्या सावध भूमिकेनंतर अचानक आता भूमिका बदलल्यामुळे विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र सेनेने आपल्या मुद्यावर ठाम राहून हिंदुत्वासाठी समाजात भरीव कार्य केल्यास पक्षाची साथ सोडून गेलेले आज ना उद्या नक्कीच स्वगृही परततील आणि सेनेचे गेलेले दिवस तिला पुन्हा पाहायला मिळतील. - नरेश घरत