आपण सारे शूद्रच!
खरंतर आपण सर्वच जण जन्माने शूद्र आहोत. आपला सर्वांचाच जन्म कमरेखालच्या भागातून म्हणजे शूद्र ठिकाणावरुन झाला असल्याने आपल्यात कोणीही वरचा नाही; जन्माने सर्वच शुद्र असले तरी प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे. ब्राह्मण बुद्धीचे, ज्ञानाचे काम करतो, क्षत्रीय लढण्याचे काम करतो, वैश्य - व्यापार, उद्योग, शेतीचे कामे करतो; पण या सर्वांना शुद्रावरच अवलंबून रहावे लागते, म्हणजे ‘पायावर'. पायाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नसल्याने सर्वात श्रेष्ठ शूद्र आहेत. प्रत्येकाची दिवसाची सुरुवात घाण काम करुनच होते, प्रत्येकजण आपली स्वतःची घाण स्वतःच धुतो. त्यानंतर स्नान, त्यानंतर देवपूजा, इतर कामे; त्यामुळे कामावरुनही शूद्राला शूद्र मानता येत नाही, कारण ही कामे आपणही करतो. कुंभमेळ्यातील साधूचे हे उत्तर पटण्यासारखे आहे.
सध्या प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभ मेळा हा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. दीडशेपेक्षा जास्त देशातून या कुंभमेळ्याचा आनंद घेण्यासाठी धार्मिक पर्यटक भारतात आले आहेत. अजूनही येणार आहेत. प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठी जत्रा भरली आहे. कडावयाची थंडी असतानाही लाखो भाविक कुंभाचा आनंद लुटत आहेत. देश विदेशातील लोकांसह विविध आखाड्यांचे संत महतांनी त्यात भाग घेतला आहे. विशेष करुन नागा संताचा महिला संतांचा सहभाग मोठा आहे.
दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यात हवसे-नवसे-गवसे यांच्यासह धार्मिक प्रवृत्तीचे लोक सहभाग घेऊन पवित्र स्नान करतात. त्यातच या वर्षीचा कुंभमेळा खासच आहे, कारण असा योग फारच कमी वेळा येतो. हा योग १४४ वर्षांनी आला आहे, म्हणूनच त्याचे महत्त्व अधिक आहे. दरवेळचा कुंभ मेळा मकर संक्रांतीच्या एक-दोन दिवस अगोदर सुरु होतो व साधारण दीड महिना चालतो. कुंभ मेळा ही संस्कृती आणि परंपरा आहे. त्याचा एक इतिहास आहे, म्हणून त्याला अंधश्रद्धा म्हणता येत नाही.
कुंभ हा विश्वास आहे. सांस्कृतिक प्रतिक आहे. वेद, उपनिषद आणि पूराणातही याचा उल्लेख आहे. सुर्याच्या १२ राशींपैकी एका राशीचे नाव कुंभ आहे. कुंभ कलाशाची स्थापना प्रथम शुभकार्य आणि तपश्चर्या दरम्यान केली जाते. पुराणानुसार विष्णू कलशाच्या मुखात असतो. गळ्यात रुद्र आणि मुळात ब्रह्म आहे. सप्तसिंधू, सप्तद्विप ग्रह, नक्षत्र आणि संपूर्ण ज्ञानही कुंभ कलशात आहे. पौराणिक कथांनुसार एकेकाळी सागर मंथन झाले. महादेव शंकराने मंथनातून मिळालेले विष प्यायले. पण मंथनातून निघालेल्या अमृत कुंभावर युध्द झाले. स्कंद पुराणानुसार हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक येथे गोदावरीच्या काठावर चार ठिकाणी अमृत घाट पडला होता. या चार ठिकाणी कुंभाचे आयोजन केले जाते. जगातील कोणत्याही विद्वानाने अमृताची चर्चा केलेली नाही. फवत भारतीयांच्या दृष्टीनेच इथे अमृताची तहान असते. अमृतावरचे प्रेम ही अमृतच आहे. सुर्य अमर आहे. उगवतो, मावळतो. पण शाश्वत आहे. महिने, वर्षे, युग निघून जातात, नद्या वाहत राहतात. कुंभमेळ्यात हजारो त्रषी, योगी आणि जादूगर आले आहेत. त्यांच्या मनात कौटुंबिक जीवनाची चिंता नसून लाखोंच्या संख्येने गृहस्थही मेळ्यात उपस्थित असतात. कुंभात स्नान करुन पुष्प अर्पण केल्याने जीवन सुंदर आणि समृद्ध होईल अशी प्रत्येकाची श्रध्दा आहे.
संस्कृतीच प्रत्येक देशाच्या साधना, उपासना आणि कृतीना चालना देते. तिची विविधता ही प्रत्येक राष्ट्राची ओळख असते. भारताने आध्यात्म शिकवले. ग्रीसने सौंदर्य शिकवले, रोमने न्याय आणि दंडपद्धती शिकवली. चीनने वैश्विक जीवनाचे मुलभूत नियम शिकवले. इराणने सत्य आणि असत्याचे व्दैत शिकवले. इजिप्तने सुमेरियन जातीनी शिकवलेली जीवन प्रणाली विधी आणि दैवी शिक्षा कायदा त्यांच्या दृष्टीकोनातून आदर्श म्हणून स्विकारले आणि त्यांच्या प्रेरणेने संस्कृती विकसित केली.
भारतीय संस्कृती आणि परंपरेत प्रतिके निर्माण करण्याची आणि प्रतीके लोकप्रिय करण्याची अद्भूत क्षमता आहे. कुंभ संस्कृती परंपरा, धर्म आणि तत्वज्ञान याचे प्रतीक आहे. पुतळे आणि मंदिरेही अशीच प्रतीके आहेत. पूर्वीच्या कुंभमेळ्यात शास्त्रार्थ होत असत. आध्यात्मिक तात्विक विषयावर चर्चा होत असत. आताच्या कुंभ मेळ्यात जातपातीवर विरोधी विचार धारेवर टीका टिप्पणी करणारी ववतव्ये होताना दिसतात. त्यातूनच अमृताऐवजी विषाची, द्वेषाची भावना तयार केली जातेय.
खरंतर आपण कोण आहोत, आपल्या अस्तित्वाचे महत्त्व काय याची आपल्याला ओळख नाही. ती जाणून देण्यासाठी पूर्वजांनी तयार केलेल्या सणावारातून ओळख दिली आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांती. एका वर्षात बारा संक्रांती येतात त्यातली एक महत्त्वाची महत्त्वपूर्ण ‘मकर संक्रांत' इथूनच उत्तरायण पूण्यकाळ सुरु होतो.
मकरसंक्रांतीच्या काळात आपण देवाला आवाहन करतो. इथूनच हिवाळा संपून जाण्याच्या मार्गावर असतो, तर वसंत त्रतू बहरण्याच्या मार्गावर असतो, या सणावेळी काही रबीची पिके काढण्याच्या मार्गावर असतात. या कालावधीत दिवस लहान तर रात्र मोठी असते, त्यामुळे रबीच्या पिकांना बळकटी येते. हा सण देशभरात विविध नावांनी ओळखला जातो. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर व दिल्ली या भागात ‘लोहरी' म्हणतात तर आसाममध्ये ‘बिहू' तामीळनाडूत ‘पोंगल' व इतर राज्यात ‘मकर संक्रांती' या नावाने साजरा केला जातो. हा सण नसून एक पर्व असते.
असे म्हणतात की, मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘गंगा' ने भगीरथाच्या तपस्येवर प्रसन्न होऊन, त्यांच्या साठ हजार पूर्वजांना मोक्ष मिळवून दिला. तेव्हापासून प्रत्येक सणाला लोक गंगा स्नान करतात. पण, मकर संक्रांतीच्या पर्वकाळात गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी आपल्याकडे ‘तीळ आणि गुळ' दिले-घेतले जातात. ते देता घेतांना आपण एक दुसऱ्याला म्हणतो ‘तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला' यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात की, आपापसातील कटूता समाप्त होते. त्याचप्रमाणे हे लहान लहान तीळ आपल्याला आपली ब्रह्माडांत ओळख काय? ब्रह्माडांत आपले अस्तित्व एका तिळाएवढेच आहे. जवळपास काहीच नाही. तरीही आपल्याला अहंकार किती आहे. तो तिळामुळे समाप्त होतो. तिळगुळाच्या सेवनाने आपल्या मनातील भावना विनम्र होतात. आपला गर्व व अहंकार गळून पडतो व आपले मन लहान मुलांप्रमाणे निर्मळ होते व आपले जीवन आनंदमय होते. याच मुहूर्तावर कुंभ पर्व ही सुरु करण्यामागे उद्देश असावा.
मकरसंक्रांतीच्या या मुहूर्तावर सुरु झालेल्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या आखाड्याचे आचार्य, महामंडलेश्वर, महंत आपापल्या परंपरेप्रमाणे हत्ती, घोडे, गाड्या, कार, मोटार सायकलवर स्वार होऊन मिरवणूकीने कुंभमेळ्यात आगमन करतात, त्यांचे स्वतःचे ध्वजही असतात. अनुयायी, शिष्यासह शवती प्रदर्शन करत शाही स्नान करतात. प्रत्येक आखाड्याला १ ते दीड तासाचा अवधी देण्यात येतो; मात्र काही संत महंत जास्त वेळेची मागणी करतात. यातून वाद विवाद निर्माण होऊन कधी कधी अराजकतेची वेळ येते, पण ते समजूतदारपणाने वागतात. मात्र काही राजकारणी, समाज कंटक, संधीचा फायदा घेत सुरळीत चाललेल्या कार्यक्रमात बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. हे कमी की काय, त्यात भर पडलीय ती ‘यु ट्युब' वरील चॅनेलवाल्यांची, ही मंडळी विविध संत महंताना गाठूनृ, स्वतःचे मनगडीत प्रश्न विचारुन त्यांना हैराण करतात, अपेक्षित उत्तरे मिळाली नाही तर, दुसऱ्या कोणाच्या तरी वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारतात; त्यातून फार मोठा विवाद होण्याचे प्रसंग येतात. उदाहरण द्यायचे झाल्यास रामभद्राचार्य विरोधी शंकराचार्य यांच्यातील वादाचे देता येईल. त्यातच रामभद्राचायार्ंनी चातुवर्ण्यावर भाष्य करुन आगीत तेल ओतले आहे. तर शंकराचार्यांनी महाकुंभातील स्नानाने पापे धुतले जातील, असे म्हणून विरोधकांच्या हातात कोलीत दिले आहे. तोही वाद धगधगत आहे.
एका पत्रकाराने तर कहरच केला आहे, त्याने एका नागा साधूला गाठून विविध विषयावर प्रश्न विचारले, ते ठीक आहे, पण, त्याने सरळ देशातील चातुवर्ण्यावर सरळ-सरळ त्यांचे मत मागताना सांगितले की, वेदात ‘चार वर्ण' सांगितले आहेत. त्यात म्हटले आहे की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आहेत आणि त्यांचा जन्म शरीराच्या विविध अवयवाशी जोडला. ब्राह्मणांचा जन्म मस्तकातून, क्षत्रियाचा जन्म भूजातून, वैश्याचा जन्म पोटातून तर शूद्राचा जन्म कमरेखालच्या भागातून (म्हणजे पायाच्या तळव्यातून) असे सांगताच साधूचे उत्तर : ‘खरं तर आपण सर्वच जण जन्माने शूद्र आहोत, कारण आपला सर्वांचाच जन्म कमरेखालच्या भागातून झाला आहे. म्हणजे शुद्र ठिकाणावरुन झाला आहे त्यामुळे आपल्यात कोणीही वरचा नाही, जर तसे असते तर, ब्राह्मणाच्या जन्माचे ठिकाण वेगळे असते, क्षत्रियांच्या जन्माचे ठिकाण वेगळे असते, वैश्याचे वेगळे असते, पण प्रत्यक्षात तसे काहीच नाही. सर्वांचा जन्म एकाच ठिकाणावरुन झाला आहे, ज्याला आपण अपवित्र मानतो. त्यावर पत्रकार म्हणतो - ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ मानतात, त्या खालोखाल क्षत्रिय येतात; तर त्या खालोखाल वैश्य येतात व सर्वात शेवटी शूद्र आहेत, त्यावर आपले मत? साधूचे उत्तर : जन्माने सर्वच शूद्र असले तरी प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे. ब्राह्मण बुद्धीचे, ज्ञानाचे काम करतो, क्षत्रीय लढण्याचे काम करतो, वैश्य - व्यापार, उद्योग, शेतीचे कामे करतो, पण या सर्वांना शूद्रावरच अवलंबून रहावे लागते, म्हणजे ‘पायावर'. पायाशिवाय कोणीही कोणतेही काम करु शकत नाहीत. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ शूद्र आहेत. त्यावर युवतीवाद करताना पत्रकार : शूद्र तर घाणीचे काम करतात. त्यावर सरळ उत्तर : आपली प्रत्येकाची दिवसाची सुरुवात घाणीचे काम करुनच होते, प्रत्येकजण आपली स्वतःची घाण स्वतःच धुतो. त्यानंतर स्नान करतो, त्यानंतर देवपूजा त्यानंतर इतर कामे, त्यामुळे कामावरुनही शूद्राला शूद्र मानता येत नाही, कारण ही कामे आपणही करतो. एवढच कशाला स्वतःचे पायताणही स्वतः पायात घालतो, हाताने उचलून ठेवतो. ही कामे शूद्राचीच. ती आपण करतो, मग आपण वेगळे व मोठे कसे?
कुंभ मेळ्यात सर्व जातीधर्माचे, वर्णाचे, साधू-संत महंत आले त्यांनी एकाच पाण्यात स्नान केले; ते वेगळेपण कुठे होते? - भिमराव गांधले